पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुमारे १,३५० किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यासोबत सुमारे ७०० प्रेशर सेन्सर्स बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यामुळे प्रत्येक जलवाहिनीतून कोणत्या भागात किती दाबाने पाणी देण्यात आले याची आॅनलाइन नोंद ठेवण्यात येत आहे.
शहरात आतापर्यंत सुमारे ३०० सेन्सर्स बसवण्यात आले असून उर्वरित सेन्सर पुढील काही दिवसांत बसविण्यात येणार आहेत, असे मनपा पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली. समान पाणी योजनेअंतर्गत शहराचे १४२ झोन करण्यात आले आहेत. प्रत्येक झोनला स्वतंत्र पाणीपुरवठा करण्यात येणार असून, त्यानुसार कोणत्या झोनमध्ये टाकीतून किती पाणी सोडले आणि शेवटपर्यंत किती पाणी पोहचले याची स्वयंचलित मीटरद्वारे नोंद ठेवली जात आहे.
त्यासाठी “स्काडा सिस्टीम’ही विकसित करण्यात आली आहे. मात्र, हे पाणी देत असताना त्याचा दाबही मोजला जात आहे. याची नोंद दररोज घेतली जात असून, संबंधित भागासाठी निश्चित केलेल्या प्रेशरच्या तुलनेत किती दाबाने पाणी दिले गेले? पाण्याचा दाब कमी होता का? पाणी जास्त दाबाने दिले का? याची दररोज नोंदणी ठेवली जात आहे.
तक्रारी सोडवण्यास मदत
एखाद्या भागातून कमी दाबाने पाणी येत असल्याची तक्रार आली, की पालिकेस तत्काळ या सेन्सर्सच्या माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे पाण्याचा दाब कमी होता, की जास्त हे तपासणे सोपे होणार आहे. प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती भागात पाण्याच्या दाबाच्या तक्रारी येतात. या भागात हे सेन्सर्स उपयुक्त ठरतील. पाण्याला नेमका कोठे अडथळा येतो, ही माहिती तत्काळ समजल्यास पाण्याच्या तक्रारी सोडविणे महापालिकेस सोपे होणार आहे.
समान पाणी योजनेत प्रत्येक झोनसाठी प्रेशर सेन्सर्स बसविण्यात आले आहेत. पाणीपुरवठा करताना त्याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे कोणत्या भागात जास्त व कोठे कमी पाणी जाते हे समजण्यासही मदत होणार आहे. – नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभाग प्रमुख