पिंपरी – एकाच नंबरच्या दोन रिक्षा सुमोरासमोर आल्यामुळे मूळ नंबर असलेल्या रिक्षा मालकाने याबाबत पोलीस ठाण्यात धाव घेतली. ही घटना बुधवारी (दि. 9) काळेवाडी येथे घडली. सुशील किसनराव भंडलकर (वय 40, रा. थेरगाव, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी किरण पवाळ (रा. एकता कॉलनी, सम्राट चौक, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि. 9) रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास तापकीर नगर काळेवाडी येथे घडली. भंडलकर यांनी त्यांच्या मालकीची रिक्षा (एमएच 14/जेसी 9711) मित्र प्रितम ननवरे यांना चालविण्यासाठी दिली. 26 जुलै आणि 28 जुलै रोजी दंडाच्या पावत्या आल्या. त्यामुळे त्यांनी फोन करून विचारणा केली. मात्र प्रीतम हे मागील 15 दिवसांपासून आजारी असून त्यांची रिक्षा थांबून असल्याचे सांगितले.
त्यानंतर भंडलकर यांनी ऑनलाइन माध्यमातून आलेल्या दंडाच्या पावतीला उघडून त्यात रिक्षाचा फोटो पाहिला असता त्यात त्यांच्या रिक्षाचा नंबर असलेली दुसरी रिक्षा दिसली. त्यामुळे भंडलकर यांनी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात धाव घेतली.
आपल्या रिक्षाचा नंबर अनोळखी व्यक्तीने त्याच्या रिक्षाला लावला असून तो वाहतुकीचे नियम मोडत असल्याची लेखी तक्रार वाहतूक पोलिसांकडे केली. 9 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास भंडलकर हे काळेवाडी येथील तापकीरनगर येथे आले असता त्यांना त्यांच्या रिक्षाच्या नंबरशी साधर्म्य असलेली रिक्षा दिसली. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. वाकड पोलिसांनी रिक्षाची पाहणी केली असता त्या रिक्षाचा नंबर एमएच 14 जेसी 5801 असा असल्याचे निष्पन्न झाले. त्या रिक्षाचा मालक किरण पवाळ याने दंड चुकविण्यासाठी भंडलकर यांच्या रिक्षाचा नंबर त्याच्या रिक्षाला लाऊन फिर्यादी आणि शासनाची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल केला.