नवी दिल्ली : पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातील पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे, या प्रकरणातील आणखी एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरातमध्ये याप्रकरणी कारवाई केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेल्या संतोष जाधव याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी संतोष जाधव सोबत त्याच्या सूर्यवंशी नावाच्या आणखी एका साथीदाराला ही पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना रात्री बारा वाजता न्यायाधीशांसमोर त्यांच्या घरी नेऊन हजर करण्यात आले असता त्यांना 20 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संतोष जाधव हा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरचा राहणारा असुन दीड वर्षांपासून तो राण्या बाणखेले नावाच्या गुडांचा खुन केल्यापासून फरार होता. त्यानंतर तो उत्तर भारतातील लॉरेन्स बिष्णोई टोळीत सामील झाला होता. या टोळीकडून खंडणी वसूल करण्यासाठी काही दिवसांपुर्वी त्याने राजस्थानमधील गंगापूर शहरातील एका व्यापाऱ्यांवर गोळीबार केला होता. मात्र संतोष जाधवची चर्चा तेव्हापासून सुरु झाली, जेव्हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात त्याच नावं घेण्यात आलं. त्याचबरोबर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल देखील त्याच नाव घेण्यात आले.
संतोष जाधवचा पंजाब, दिल्ली आणि मुंबई पोलीसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला. त्यासाठी वेगवगेळ्या राज्यातील पोलीस पुण्यात तळ ठोकून आहेत. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुजरातमधील कच्छमधून त्याला अटक करण्यात यश मिळवले आहे. काही दिवसांपुर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी सौरभ महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे या त्याच्या साथीदाराला ही अटक केली होती.