शिक्रापूर (वार्ताहर)- शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विद्युत रोहित्र चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिक व शेतकरी हैराण झालेले असताना टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. यात खासगी वायरमन व भंगार व्यवसायिकासह तब्बल सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
अनिकेत रमेश सरोदे (वय १९), करण भगत लिंगायत (दोघे रा. बुरुंजवाडी), प्रथमेश संतोष सासवडे (रा. बजरंगवाडी) ओंकार रमेश उमाप (रा. जातेगाव बुद्रुक) यांना ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांनी चोरलेले काही तांबे व कॉपर हे खरेदी करणारे भंगार व्यावसायिक मोहम्मद आसिफ अख्तर हुसेन खान (रा. तळेगाव ढमढेरे रोड शिक्रापूर, मूळ रा. बनैतुल, उत्तरप्रदेश),
अक्षय चंद्रकांत कदम (रा. पेरणे फाटा) व घनश्याम अवधराम यादव (रा. मलठण फाटा शिक्रापूर मूळ रा. उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तांब्याच्या काही पट्ट्या जप्त करीत त्यांना अटक केली.
शिक्रापूर हद्दीमध्ये रोहित्र चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने चोरट्यांचा पर्दाफाश करणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालेले होते. रोहित्र चोरणारी टोळी शिक्रापूर व बुरुंजवाडी परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,
हवालदार जनार्दन शेळके, तुषार पंदारे, राजू मोमीन, योगेश नागरगोजे, संजू जाधव, सचिन घाडगे, अजित भुजबळ यांनी शिक्रापूर परिसरात सापळा रचून खासगी वायरमन असलेल्या अनिकेत सरोदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या काही साथीदारांच्या मदतीने शिक्रापूर परिसरातील अनेक गावांमध्ये रोहित्र फोडून त्यातील वेगवेगळ्या धातूच्या पट्ट्या चोरल्याची कबुली दिली.
पथकाने पुढील तपासासाठी शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमोल दांडगे व किशोर तेलंग हे करीत आहेत.
दैनिक प्रभातचे वृत्त खरे ठरले
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करुन पर्दाफाश केलेल्या रोहित्र फोडणाऱ्या टोळीकडून शिक्रापूरसह रांजणगाव गणपती पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गुन्हे उघड होण्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. शिरूर तालुक्यात रोहित्र चोरीच्या घटना सर्वाधिक आहेत.
गेल्या वर्षभरात सुमारे ५० रोहित्र फोडीच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या टोळीत स्थानिक सराईताचा सहभाग असल्याची शक्यता दैनिक प्रभातने वर्तविली होती. गुन्हे अन्वेषण पथकाने टोळीतील स्थानिकांचा सहभाग उघड केल्याने हे वृत्त तंतोतत खरे ठरले आहे.