नवी दिल्ली – जगभरातील तब्बल 110 देशांनी भारत बायोटेकने तयार केलेली करोना लस कोव्हॅक्सीन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली लस कोविशील्डला मान्यता दिली आहे, अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार जगातील उर्वरीत देशांशी संपर्कात आहे. ज्यामुळे शिक्षण, व्यवसाय आणि पर्यटन हेतूंसाठी परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांचा प्रवास सुलभ होईल. अशी अपेक्षा आहे की लवकरच कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनला उर्वरित देशातही मान्यता मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, असे अनेक देश आहेत ज्यांचे राष्ट्रीय मान्यताप्राप्त किंवा डब्ल्यूएचओ-मान्यताप्राप्त लसींसाठी लसीकरण प्रमाणपत्रांच्या परस्पर मान्यता देण्याबाबत भारतासोबत करार आहेत. परंतु, असे अनेक देश आहेत ज्यांचा सध्या भारतासोबत असा कोणताही करार नाही.