हैदराबाद- विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांनी पत्नीबाबत अपशब्द वापरल्याने तेलुगु देसम पार्टीचे नेते एन. चंद्राबाबू नायडू प्रचंड व्यथित झाले. पत्रकार परिषद सुरू असतानाच त्यांनी अश्रुंना मोकळी वाट करून दिली. तसेच यावेळी त्यांनी जोपर्यंत सत्तेत येत नाही, तोपर्यंत विधानसभेत पाय ठेवणार नाही, अशी प्रतिज्ञाही केली.
सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेसच्या सदस्यांकडून चंद्राबाबू नायडूंबद्दल सातत्याने अपशब्द वापरले जात आहेत. त्यात त्यांच्या पत्नीबद्दलही अनुद्गार काढण्यात आल्याने चंद्राबाबू प्रचंड व्यथित झाले. या सर्व प्रकरणावर भाष्य करण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
त्याचवेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या पत्नीबाबत काढलेल्या अपशब्दांबाबत बोलायला सुरुवात केली. त्याबाबत बोलत असताना चंद्राबाबूंना अचानक भावना अनावर झाल्या आणि ते अक्षरश: रडायला लागले. मी गेल्या चार दशकापासून भारतीय राजकारणात आहे. पण माझ्याशी कोणीच एवढे अपमानास्पद वागले नाही, असे ते म्हणाले.
हिवाळी अधिवेशनात महिला सक्षमीकरणावर चर्चा सुरू होती. यावेळी सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेसच्या नेत्यांनी नायडू आणि त्यांच्या पत्नीबाबत अपशब्द वापरले. त्यावर नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या अडिच वर्षापासून मी हा अपमान सहन करत आहे. आज तर त्यांनी माझ्या पत्नीलाच लक्ष्य केले. मी नेहमीच सन्मानासाठी आणि सन्मानाने राहिलो. मात्र, आता मी अधिक सहन करू शकत नाही, असं ते म्हणाले.