पुणे – कोविशिल्ड या करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत त्याची संरक्षणक्षमता उच्च दर्जाची असते, असे 500 हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तपासणीत आढळून आले आहे. हे विश्लेषण येथील बी. जे. मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालयाने केले होते.
दोन डोसनंतर या क्षणाला तरी उच्च दर्जाचे संरक्षण (सेरोसर्व्हेलन्स) मिळत आहे. त्यामुळे लोकसंख्येचा एक मोठा वर्ग अद्याप दुसऱ्या मात्रेपासून वंचित असताना बुस्टर डोसचा पर्यायाचा सल्ला देण्यात सध्या तरी अर्थ नसल्याचा यातून निष्कर्ष निघत असल्याचे बी. जे. मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक आणि कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले.
लसीच्या दोन्ही मात्रा दिल्यानंतर काही महिन्यांनंतरही प्रतीपिंडांचे प्रमाण 90 टक्के पेक्षा अधिक होते, असे यात सहभागी झालेल्या सर्व वर्गातील 558 आरोग्य कर्माऱ्यांमध्ये आढळून आले आहे, असे या अभ्यासात स्पष्ट आहे. यात सहभागी झालेल्यांमध्ये ससूनमधील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
तांबे म्हणाले, दोन्ही मात्रा पूर्ण झाल्यानंतर कालावधी वाढल्याने प्रतिपिंडे (अँटीबॉडी) आढळण्याचे प्रमाण कमी जरी झाले तरी रोगप्रतिकारकशक्ती उच्चतम असते. पूर्ण लसीकरण झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात 96.77 टक्के अँटीबॉडीजचे प्रमाण असते. तर चौथ्या महिन्यात ते वाढून 100 टक्के होते. तर सहाव्या महिन्यात तेघटून 91.89 टक्के होते.