जिल्ह्यात आज नवे 11 पॉझिटिव्ह 

बाधितांची संख्या 163 वर; प्रशासनापुढे करोनाचे वाढते संकट 

नगर  -नगर शहरासह जिल्ह्यातील करोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, आता यामध्ये पुन्हा अकरा रुग्णांची भर पडली आहे. नगर शहरातील उच्चभ्रू वसाहतीत सापडलेल्या करोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या अजून एका महिलेला करोनाची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 163 पाहोचली आहे.

गेल्या चार दिवसांपासून नगर जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सोमवारी सायंकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातील 78 जण ठणठणीत झाले आहेत. त्यात शहरातील माळीवाडा येथील 25 वर्षीय युवकाला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. शेवगाव तालुक्‍यातील राणेगाव येथील तीस वर्षीय युवक, नगर शहरातील भवानीनगर येथील 29 वर्षीय युवक, संगमनेर येथील 35 वर्षीय युवक, अकोले तालुक्‍यातील कोतूळ येथील 32 वर्षीय युवकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर उशिरा प्राप्त झालेले 69 अहवाल निगेटिव्ह आले. मंगळवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात 11 रुग्णांची भर पडल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.

मंगळवारी करोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये अकोले तालुक्‍यातील सहा व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये जवळे येथील 48 आणि 24 वर्षीय महिला आणि 28 वर्षीय पुरुष बाधित आढळले, तर वाघापूर येथील 32 आणि 40 वर्षीय महिला आणि 45 वर्षीय पुरुष बाधित आढळले. सर्व बाधित यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात   आल्याने त्यांना करोनाची लागण झाली.संगमनेर तालुक्‍यातील डिग्रज येथे 21 वर्षीय, तर मालुंजा येथील 45 वर्षीय महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

या दोन्ही महिला यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना करोनाची लागण झाली. तसेच श्रीगोंदा तालुक्‍यातील कांडेगाव येथील 75 वर्षीय महिलेलाही करोनाची बाधा झाली आहे. राहाता तालुक्‍यातील लोणी येथील 56 वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आली. तसेच नगर शहरातील स्टेशन रोडवरील 33 वर्षीय महिलाही करोनाबाधित आढळून आली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील 26, जिल्ह्यातील 87, इतर राज्य दोन, इतर देश आठ इतर जिल्हा 40 असे रुग्ण आहेत.

सोमवारी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालातून नगर शहरातील भवानीनगर व माळीवाड्यातील दोघांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने हालचाली सुरु केल्या असून, भवानीनगरमधील करोना बाधिताच्या संपर्कातील पाच जणांना तसेच माळीवाड्यातील करोनाबाधितांच्या संपर्कातील 15 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचे स्त्राव तपासले जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.

पाच रुग्णांना मिळाला डिस्चार्ज 
डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये श्रीरामपूर तालुक्‍यातील वडाळा महादेव येथील एक, संगमनेर येथील एक, पारनेर तालुक्‍यातील म्हसणे फाटा येथील एक आणि नगर तालुक्‍यातील दोन, अशा एकूण पाच रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 78 झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.