नवी दिल्ली – मध्यप्रदेशात आदिवासींवर गोळीबार केल्याचा आरोप असलेल्या आमदार पुत्राच्या अटकेसाठी पोलिसांनी 10 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. सिंगरौलीचे आमदार राम लल्लू वैश्य यांचे पुत्र विवेकानंद वैश्य यांच्याबाबतची खात्रीशीर माहिती देणाऱ्याला हे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी आदिवासींवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर विवेकानंद वैश्य फरार झाले होते.
विवेकानंद वैश्य यांनी गुरुवारी मोरबी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सूर्य कुमार खैरवार या आदिवासीवर गोळीबार केला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वैश्य यांच्यावर गेल्या वर्षी 20 जुलै रोजी देखील गोळीबाराच्या एका प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्या प्रकरणी त्यांना जामीन मंजूर झाला आहे. तो जामीन देखील रद्द करण्यात यावा, अशी मागणीही मध्य प्रदेश उच्च न्यायालायाकडे केली जाणार आहे, असेही सिगरौलीचे पोलीस अधिक्षक युसुफ कुरेशी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
विवेकानंद वैश्य यांनी गेल्या वर्षी वनरक्षकाला धमकावण्यासाठी गोळीबार केला होता. त्यानंतर लगेचच वैश्य फरार झाले होते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये स्थानिक न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर 40 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयातून जामीन मिळवला होता.
गुरुवारी किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर त्यांनी आदिवासीवर गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न, धमकावणे आणि शस्त्रांबाबत अन्य गुन्हे दाखल झाले आहेत.