मेलबर्न :- भारतीय बॅडमिंटन स्टार एच.एस. प्रणॉयने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. प्रणॉयने देशवासिय प्रियांशू राजावतचा 43 मिनिटांमध्ये 21-18,21-12 असा सरळ सेटमध्ये पराभव करून पहिल्यांदाच या स्पर्धेची फायनल गाठली आहे. आता अंतिम फेरीत 24व्या क्रमांकावरील वेंग होंगयांगचे त्याच्यासमोर आव्हान असणार आहे.
उपांत्य सामन्यात प्रणॉयविरुद्ध 21 वर्षीय प्रियांशूने चांगली सुरुवात केली. विशेषतः पहिल्या सेटमध्ये त्याचा खेळ उल्लेखनिय होता. यादरम्यान प्रियांशूने प्रणॉयवर सतत हल्ला केला. पण प्रियांशु आपली ही लय राखू शकला नाही. त्यामुळे प्रणॉयने शानदार पुनरागमन करताना पहिला सेट 21-18 असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये मात्र प्रियांशुचा आत्मविश्वास डळमळलेला दिसला. ज्यामुळे त्याने अनेक चुका केल्या व प्रणॉयने दुसऱ्या सेट 21-12 असा जिंकताना अंतिम फेरीचे तिकीट नक्की केले.
अलीकडेच प्रणॉयने थॉमस करंडक जिंकून इतिहास रचला. त्याचवेळी, आता भारतीय चाहत्यांना प्रणॉयकडून ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याची अपेक्षा आहे. प्रणॉय ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 8 वेळा खेळला आहे, ज्यामध्ये 6 वेळा तो उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.
पुरुष एकेरीच्या इतिहासातील यशस्वी बॅडमिंटनपटूंमध्ये प्रणॉयची गणना केली जाते. विशेषत: एचएस प्रणॉयने आपल्या सातत्याने प्रभावित केले आहे.