मॉस्को – ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या उगवत्या अर्थव्यवस्थांच्या ब्रिक्स गटामध्ये आणखीन नवीन सदस्य सहभागी होणार आहेत. रशियाच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्सच्या वर्षाला आजपासून प्रारंभ झाला. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनीच या गटामध्ये आणखीन १० देश सहभागी होणार असल्याचे सूतोवाच केले आहे.
या गटात आता इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे नवीन सदस्य म्हणून सामील झाले आहेत. आता नवीन सदस्यांना कामकाजामध्ये सहभागी करून घेण्यासाठी भागीदार सदस्य ही नवीन श्रेणी सुरू करण्यात येणार आहे, असेही पुतीन यांनी सांगितले.
गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये झालेल्या ब्रिक्स परिषदेमध्ये १ जानेवारीपासून अर्जेंटिनासह अन्य काही नवीन सदस्य देशांना सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष जेवियर मिले यांनी गेल्या आठवड्यात ब्रिक्सचे सदस्य होण्यापासून माघार घेण्याची घोषणा केली. इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती ब्रिक्समध्ये नवीन पूर्ण सदस्य म्हणून सामील झाले.
नवीन सदस्यांना सहभागी करून घ्यायला आपण पहिल्यापासून उत्सुक असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. सार्वभौमत्व, समानता, खुलेपणा, एकवाक्यता, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये बहुस्तरीय व्यवस्था आणि जागतिक पातळीवरील वित्तीय व्यापारी व्यवस्था निर्माण करण्याच्या मुद्यांवरही त्यांनी भर दिला. ब्रिक्सच्या बहुआयामी अजेंड्यात सामील होण्यासाठी आणखी ३० देश तयार असल्याचे पुतीन म्हणाले.