मुंबई – महाराष्ट्र सरकार सिंधुदुर्गात देशातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देणार होते. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्रविश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प राज्य सरकार राबवणार होते. परंतु, हा प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका येथे होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. यावरून प्रचंड राजकीय गदारोळ झाला. यावर आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी हा प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली असल्याची माहिती रविंद्र चव्हाण यांनी एक्स पोस्टद्वारे दिली. रविंद्र चव्हाण म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत वेंगुर्ला येथेच होणार.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प हा जिल्ह्याच्या पर्यटन व विकासाला चालना देणारा प्रकल्प असून हा आमच्या शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. तसेच नियोजनानुसार कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेंगुर्ला येथूनच कार्यान्वित होणार आहे. मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी विरोधक या प्रकल्पाबाबत जाणूनबुजून गैरसमज पसरवत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली.
या बैठकीत प्रस्तावित पाणबुडी प्रकल्पाची सद्यस्थिती व वस्तुस्थिती जाणून घेतली. या प्रकल्पासाठी आवश्यक निधीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. पाणबुडी पर्यटन विकासासाठी मंजूर निधीपैकी काही निधी हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे(एमटीडीसीकडे) वर्ग करण्यात आला आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही व सदर प्रकल्प सकारात्मक पूर्ण होण्याच्या दृष्टीने विभागाने तातडीने प्रयत्न करावेत असे निर्देश यावेळी उपस्थितांना दिले.