बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जी.परमेश्वर यांनी पक्षात अनेक महत्वाकांक्षी नेत्यांचा भरणा असल्याचे सूतोवाच गुरूवारी अप्रत्यक्षपणे केले. कर्नाटक कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाचे 10 दावेदार आहेत. त्यापैकी मी एक आहे, असे त्यांनी म्हटले. भाजपची सत्ता असणाऱ्या कर्नाटकमध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे.
यावेळच्या निवडणुकीत चांगली कामगिरी होण्याचा विश्वास कॉंग्रेसला वाटत आहे. त्यातून आतापासूनच पक्षात मुख्यमंत्री बनण्याची चढाओढ सुरू झाली आहे. कॉंग्रेसला सत्ता मिळाल्यास माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री बनवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिद्धरामय्या आणि शिवकुमार या प्रबळ दावेदारांव्यतिरिक्त इतरही नेते आकांक्षा बाळगून असल्याचे परमेश्वर यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले. प्रत्येक जण सत्तेच्या इच्छेपोटीच राजकारणात सक्रिय असतो.
प्रत्येकाला राजकीय आकांक्षा असते, अशी परखड भूमिका त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. परमेश्वर हे माजी उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी याआधी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली. त्यामुळे कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची वर्णी लागते.