शिक्रापूर पोलिसांकडून तीनच दिवसांत छडा : चारित्र्याच्या संशयातून खून
शिक्रापूर – मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथील एका पोल्ट्रीवर काम करणाऱ्या एकाने पत्नीचा खून करून घराला बाहेरून कडी लावून पोबारा केल्याची घटना आठ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. या गुन्ह्यातील फरारी पतीस तीन दिवसांत अटक करीत खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे.
चारित्र्याच्या संशयातून हा खून केल्याने आरोपीने कबुल केले आहे.
मिडगुलवाडी येथील अमोल मिडगुले यांनी त्यांच्या शेतातील पोल्ट्री फार्मवर कामासाठी ठेवलेल्या दाम्पत्यातील प्रेमसिंग पटेल यांनी त्यांची पत्नी माया पटेल हिचा खून करून पोबारा केला होता. याबाबत पोल्ट्री मालक अमोल ज्ञानेश्वर मिडगुले (रा. मिडगुलवाडी, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. शिक्रापूर पोलिसांनी मयत महिलेचा पती प्रेमसिंग देवराम पटेल (रा. पानंद, जि. खंडाळा) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. यावेळी आरोपी प्रेमसिंग याचा शोध घेणे शिक्रापूर पोलिसांपुढे एक आव्हान होते. आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील एका ठिकाणी असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली.
त्यांनतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर खिलारे, निखिल रावडे, नीरज पिसाळ, विकास मोरे यांनी विसापूर (ता. श्रीगोंदा) येथे आरोपी प्रेमसिंग पटेल याला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली. पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून दोघांमध्ये वाद झाला. त्या वादाचे पडसाद मोठ्या भांडणात उमटले. दोघांमध्ये वाद झाल्यामुळे प्रेमसिंग याने पत्नीला काठीने मारहाण करत तिचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केला.
त्यांनतर कोणालाही समजू नये म्हणून घराला बाहेरून कुलूप लावून लहान मुलाला घेऊन विसापूर येथे पळून आल्याचे प्रेमसिंग याने सांगितले आहे. शिक्रापूर पोलिसांनी प्रेमसिंग देवराम पटेल याला आज रात्री उशिरा अटक केली असून त्याला मंगळवारी (दि.12) शिरूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके करीत आहेत.