पुणे – सातारा सैनिकी शाळा ही देशातील पहिली सैनिकी शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेला 1 कोटी 64 लाख रुपयांचे वेतनेत्तर अनुदान मंजूर झाले आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत.
23 जून 1961 रोजी या शाळेची स्थापना झाली. राज्यातील गरीब व होतकरु मुलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून भारतातून सैन्यदलात अधिकारी पदावर संधी मिळावी, या उद्देशाने शाळा सुरू झाली. यातून विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये भरती झाले.
या शाळेला प्रतिवर्षी वेतनेत्तर अनुदान मंजूर होते. वित्त विभागाच्या परिपत्रकान्वये 25 टक्के निधी वितरीत करण्यास मान्यता मिळाली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 2 कोटी 4 लाख 67 हजार इतका निधी वितरित झाला आहे. 2020-21 या वर्षासाठी 6 कोटी 56 लाख 85 हजार रुपये इतकी अर्थसंकल्पीत तरतूद आहे. 2019-20 या आर्थिक वर्षातील उर्वरीत निधी व 2020-21 या वर्षासाठी आगाऊ अनुदान असे एकूण 3 कोटी 99 लाख 10 हजार रुपये इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
आता 2020-21 या वर्षासाठी 1 कोटी 36 लाख 44 हजार रुपये व आगाऊ अनुदान म्हणून 27 लाख 76 हजार रुपये शासनाने मंजूर केले. त्यात प्रशिक्षण व व्यवस्थापकीय खर्चासाठी 51 लाख 19 हजार 601 रुपये, आहारभत्तासाठी 57 लाख 79 हजार 640 रुपये, इमारत देखभाल खर्चासाठी 8 लाख रुपये, घोडा देखभालीकरिता 14 लाख 70 हजार रुपये, जाहिरात खर्चासाठी 3 लाख 94 हजार 793 रुपये, नगरपालिका करासाठी 80 हजार 689 रुपये याप्रमाणे शाळेला निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
निधी खर्च करताना शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे लागणार आहे, असे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इ. मु. काझी यांनी आदेशात नमूद केले आहे.