नारायणगाव – हुमणी किडीचे सामुहिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, त्यामध्ये कारखाने, कृषी विभाग, आत्मा, केव्हीके यांनी मिळून प्रयत्न करावे, त्यासाठी केव्हीके सर्वतोपरी प्रयत्न करेन. कृषी विद्यापीठ व “केव्हीके’च्या शिफारशीनुसार वेळेत हुमणी किडीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन यावेळी ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषीरत्न अनिल मेहेर यांनी केले.
ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक हुमणी कीड व्यवस्थापन या विषयीचे कृषी विस्तार अधिकाऱ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमासाठी जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पुणे येथील प्रकल्प उपसंचालिका पूनम खटावकर, विभागीय कृषी विस्तार, पुणे केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रवींद्र कारंडे, कृषी कीटकशास्त्रज्ञ डॉ. अंकुश चोरमुले, “केव्हीके’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रशांत शेटे, शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, योगेश यादव, भरत टेमकर, धनेश पडवळ, तसेच जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या तालुक्यांतील कृषी विस्तार अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, एटीएम, बीटीएम, कृषी मित्र, विघ्नहर सहकारी साखर कारखाना आणि पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथील कृषी अधिकारी, ऊस विकास अधिकारी, कर्मचारी तसेच तालुक्यातील ऊस उत्पादक प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
पूनम खटावकर यांनी यावेळी म्हणाल्या, आत्मामार्फत शेतीशाळा, कार्यशाळा घेऊन हुमणी किडीचे व्यवस्थापन करण्याचे मार्गदर्शन केले जाईल.
डॉ. रवींद्र कारंडे म्हणाले, या किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करताना सामूहिकरीत्या पहिला पाऊस पडण्याच्या वेळी बांधावरील कडुनिंबाच्या, सुबाभळ आदी झाडाखालील पडलेले भुंगेरे रॉकेलमिश्रित द्रावणात टाकून नष्ट करण्यात यावे.
डॉ. दत्तात्रय गावडे म्हणाले, हुमणी किडीचे जैविक पद्धतीने व्यवस्थापन करताना मेटारायझिअम व बिव्हेरियाचा वापर करावा, तसेच सोलर/प्रकाश सापळे लावून भुंगेरे गोळा करावे व ते नष्ट करण्यात यावे. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. दत्तात्रय गावडे यांनी केले. सूत्रसंचलन योगेश यादव यांनी केले आणि धनेश पडवळ यांनी आभार मानले.
कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या योजना तसेच हुमणी किड क्रॉपसॅप अंतर्गत उपाययोजना राबवणे या विषयी मार्गदर्शन केले तसेच पुढे बोलताना म्हणाले की, हुमणी किडीचे व्यवस्थापन करिता सर्व विभागांनी एकत्र येऊन सामुहिकरीत्या नियोजन करणे गरजेचे आहे.
– बाळासाहेब पडघलमल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
विघ्नहर कारखान्यामार्फत या वर्षी दहा टन हुमणी किडीचे भुंगेरे गोळा करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे हे भुंगेरे 300 रुपये किलोने विकत घेतले जातील व त्याची योग्य ती विल्लेवाट लावली जाईल त्यामुळे परिसरातील हुमणी किड नियंत्रणात येण्यास मदत होईल.
– भाऊसाहेब उकिर्डे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कृषी अधिकारी