पुणे – हवेची गुणवत्ता माहिती “अपडेट’चा विसर

काही केंद्रांत माहितीच उपलब्ध नाही


बहुतांश शहरातील नोंदी मार्च, एप्रिल महिन्यातील


हवेच्या गुणवत्तेची स्थिती दर्शविणार “सिटी रेटिंग’


राज्यात “स्टार रेटिंग’च्या धर्तीवर उपक्रम

पुणे – औद्योगिक क्षेत्रातील हवा प्रदूषणाबाबत “रिअल टाइम’ माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून “स्टार रेटिंग’ हा उपक्रम राबविण्यात येतो. याच धर्तीवर आता शहरातील हवेच्या गुणवत्तेची स्थिती दर्शविण्यासाठी मंडाळातर्फे “सिटी रेटिंग’ हा उपक्रम सुरू केला आहे. मात्र, मुंबई आणि पुणे याठिकाणचे तीन केंद्र वगळता राज्यातील इतर केंद्रांकडे हवेच्या गुणवत्तेची “अपडेटेड’ माहिती उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. बहुतांश शहरातील नोंदी या मार्च अथवा एप्रिल महिन्यातील असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.

मंडळाने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हवेच्या गुणवत्तेबाबत माहिती देणारा “सिटी रेटिंग’ हा उपक्रम सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 4 जून रोजी मुंबई येथे या उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील हवेच्या गुणवत्तेची सद्यस्थिती संकेतस्थळावर जाणून घेता येणार आहे. ही गुणवत्ता मंडळाने उभरलेल्या हवेची गुणवत्ता मोजणी केंद्रांद्वारे मोजली जाते. राज्यात एकूण 83 गुणवत्ता मोजणी केंद्र असल्याचे मंडळाच्या संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे. तसेच, विविध शहरांच्या हवेच्या गुणवत्तेची नोंद या उपक्रमांतर्गत नोंदविण्यात आली आहे. मात्र, मुंबई येथील बांद्रा आणि एरोली केंद्र आणि पुण्यातील कर्वेनगर येथील केंद्रावरच जून महिन्याच्या नोंदी देण्यात अल्या आहेत. ही केंद्रे वगळता इतर सर्व केंद्रांवर मार्च अथवा एप्रिल महिन्याच्या नोंदींची माहिती देण्यात आली आहे.

एकूणच क्षणाक्षणाला हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी घेणाऱ्या केंद्रामध्ये तीन महिन्यांपासूनची अद्ययावत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळेच संकेतस्थळावर ही अद्ययावत माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट होते. पुण्यात मंडळातर्फे भोसरी, स्वारगेट, कर्वेनगर, नळस्टॉप आणि पिंपरी-चिंचवड या चार स्थानकांपैकी केवळ कर्वेनगर येथील स्थानक कार्यान्वित आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या हवेच्या प्रदूषणाच्या नोंदीच घेतल्या जात नसून, यातून मंडळाची उदसीनता पुन्हा एकदा समोर आली आहे.

…तर अद्ययावत माहिती घेतली जाईल
याबाबत मंडळ प्रशासनाशी संपर्क साधला असता, “नागरिकांना हवेच्या प्रदूषणाची अद्ययावत स्थिती समजावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नोंदणी केंद्रांकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे “सिटी रेटिंग’ची माहिती देण्यात आली आहे. याबाबत तांत्रिक विभाग आणि नोंदणी केंद्राशी संपर्क साधून अद्ययावत माहिती घेतली जाईल,’ असे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.