- वाहतूक पोलिसांची माहिती
- रोजची कोंडी टळली, वाहतूक सुरळीत
पिंपरी – गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन सरकारने नागरिकांना केले आहे. त्यातच करोनाच्या भितीमुळे अनेकजण घरूनच काम करीत आहेत. याचा थेट परिणाम रस्त्यावरील वाहतुकीवर झाला आहे. शहरातील रस्त्यावरील वाहने 50 ते 60 टक्क्यांनी कमी झाली असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या सहाय्यक आयुक्त नीलिमा जाधव यांनी दिली आहे.
“करोना’चा वाढता प्रसार रोखण्यासाठी सरकारने दहावीच्या वगळता इतर सर्व परीक्षा रद्द करीत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. आयटी कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचा थेट परिणाम रस्त्यावरील वाहतुकीवर झाला आहे. रस्त्यावरील वाहने खूप कमी झाली आहे. यामुळे शहरात विविध ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी बंद झाली आहे. हिंजवडी भागातही सकाळी व सायंकाळी होणारी वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
“ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह’ची कारवाई थंडावली
वाहतूक विभागाकडून मद्यपी वाहन चालकांवर “ड्रंक ऍन्ड ड्राइव्ह’ची कारवाई केली जाते. यासाठी ब्रिथ ऍनालाइजरचा वापर केला जातो. मात्र हे यंत्र नळीच्या सहाय्याने एकाच्या तोंडातून दुसऱ्याच्या तोंडात तपासणीसाठी दिले जाते. मात्र करोनाचा प्रसार रोखण्यासाठी या यंत्राचा वापर पूर्णपणे बंद करा, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे “ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह’ची कारवाई थंडावली आहे. जर या तपासणीची खूपच गरज असेल तर संबंधित चालकाला वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेले जाते. त्यांच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाते. ही कारवाई थंडावल्याने वाहतूक विभागाच्या महसूलातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे. तसेच योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही वाहतूक विभागाच्या सहाय्यक आयुक्त नीलिमा जाधव यांनी दिली आहे.