पुणे- कृषी महाविद्यालयातून सुरू झालेला मेट्रोचा भुयारी मार्ग अखेर सिव्हिल कोर्ट येथपर्यंत पोहोचला आहे. हा मार्ग बनवणारी टनेल बोरिंग मशीन कोर्टाच्या आवारात स्थानकासाठी खोदलेल्या खड्ड्यापर्यंत येऊन पोहोचली. सोमवार दुपारी तीन वाजता हा ऐतिहासिक “ब्रेक थ्रू’ टप्पा पार पडला. मेट्रोकडून जमिनीखाली 28 मीटर खोलीवर बोगद्यात तिरंगा फडकावून या यशस्वीतेचा आनंद व्यक्त करण्यात आला.
मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गात 5 कि.मी.चा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग कृषी महाविद्यालय येथील सुरवात होत असून स्वारगेट पर्यंत जाणार आहे. या मार्गामध्ये शिवाजीनगर बसस्थानक, सिव्हील कोर्ट, फडके हौद, मंडई आणि स्वारगेट ही पाच स्थान असणार आहेत. भुयारी मार्गाचे काम लवकर होण्यासाठी स्थानकांच्या ठिकाणी मोठा खड्डा करून खालून बांधकाम करण्यात येते. भुयारी मार्गाचे काम टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने करण्यात येते. जेव्हा टनेल बोरिंग मशीन भुयारी स्थानकासाठी खोदलेल्या खड्ड्यात दाखल होते, या घटनेला “टनेल ब्रेक थ्रू’ म्हटले जाते. सोमवारी दुपारी मेट्रोच्या कामातील हा महत्वाचा मैलाचा दगड पार पाडला आहे.
कृषी महाविद्यालय येथून 30 ऑक्टोबर 2019ला या टनेल बोरिंग मशीनच्या कामाची सुरूवात झाली. बरोबर 10 महिन्यांनी 1600 मीटरचे टनेलचे काम पूर्ण करून सोमवारी ती सिव्हिल कोर्ट येथे दाखल झाली. मशीन 10 मिलिमीटर अचूकतेने सिव्हिल कोर्ट येथे दाखल झाले.
सिव्हिल कोर्ट येथे 160 मी एन.ए.टी.एम पद्धतीद्वारा एक बोगदा करण्याचे काम चालू आहे. या बोगद्याच्या उत्तरेकडील भागामध्ये टनेल बोरिंग मशीनच्या कटरने प्रवेश करून हा “ब्रेक थ्रु’ साधला आहे, अशाप्रकारे एन.ए.टी.एम बोगद्यात टनेल ब्रेक थ्रू ही निवडक घटनापैकी एक आहे. टनेल बोरिंग मशीनचा 6.4 मीटरच्या अजस्त्र कटर हेडने जेव्हा दगड फोडून एन.ए.टी.एम. बोगद्यामध्ये प्रवेश केला तेव्हा महामेट्रोच्या उपस्थित इंजिनिअर आणि अधिकारी वर्गाने त्याचे जल्लोषात स्वागत केले.
ब्रेक थ्रू करणाऱ्या मशीनचे नाव “मुठा’ असून त्याच्या सोबतीने “मुळा’ टीबीएम मशीन लवकरच सिव्हिल कोर्ट येथे “ब्रेक थ्रू’ साधणार आहे. यावेळी महामेट्रोच्या संचालक अतुल गाडगीळ, महाव्यवस्थापक जनसंपर्क हेमंत सोनावणे, टाटा प्रोजेक्टचे राजेश जैन आणि बेनी जोसेफ आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
आजचा “ब्रेक थ्रू’ पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाचा महत्त्वाचा टप्पा आहे. महामेट्रोने पुणेकरांचे मेट्रोत प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महामेट्रो प्रयत्नशील आहे. महामेट्रो अत्यंत गुणवत्तापूर्वक आणि सर्व सुरक्षा नियमांना अधीन राहून मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करत आहे.
– डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो