पुण्यात वाहतूक कोंडीचे खापर मेट्रोच्या माथी

  • वाहतूक पोलिसांच्या पाहणीतून प्राथमिक निष्कर्ष
  •  पुणेकरांच्या बेशिस्त पार्किंगमुळेही कोंडीत भर

 

पुणे – शहरातील वाहतूक कोंडी मेट्रो सुरू झाल्यानंतर सुटेल, अशी आशा पुणेकरांना आहे. मात्र, सध्या याच मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष वाहतूक पोलिसांच्या पाहणीतून समोर आला आहे.

 

शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा वेळ देखील गृहीत धरावा लागतो. पुण्यातील वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने वाहतूक विभागाकडून शहरातील विविध रस्त्यांची प्रत्यक्ष प्रवास करत पाहणी करण्यात येत आहे. मेट्रोच्या कामांमुळे अनेक रस्त्यांवर कोंडी होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष यातून समोर आला आहे. तर वर्दळीच्या रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंग, दुतर्फा असणारे पार्किंगमुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे.

 

वाहतूक शाखेच्या या मोहिमेंतर्गत संबंधित रस्त्यावर ये-जा करताना लागणारा वेळ, अंतर पार करण्यासाठी अपेक्षित वेळ, विकासकामांचा आढावा, पार्किंग, वाहतूक कोंडी आदींचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानुसार मेट्रोचे काम सुरू असणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक बदल, पार्किंग समस्या असणाऱ्या रस्त्यांवर नो-पार्किंगसह विविध पर्यायांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या पाहणीच्या अंतिम निष्कर्षानंतर शहरातील 24 वाहतूक विभागांतर्गत उपाययोजना करण्यात येणार आहेत.

 

येथे केली पाहणी

शहरातील विविध भागात वाहतूक शाखेच्या सर्व विभांगामधील कर्मचाऱ्यांनी गर्दीच्या वेळात प्रत्यक्ष प्रवास करत वाहतुकीच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने नगर रस्ता, कर्वे रस्ता, जुना मुंबई-पुणे रस्ता, बाजीराव रस्ता, जे.एम.रस्ता, गणेशखिंड रस्ता, शिवाजी रस्ता, एफ.सी रस्ता, स्वारगेट अशा सर्वाधिक वाहनांची रहदारी असणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक शाखेने पाहणी केली आहे.

 

शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या सुमारे 20 मार्गांची वाहतूक शाखेने पाहणी केली आहे. शहराच्या विविध भागांत होणारी वाहतूक कोंडी आणि त्यासंबंधीच्या उपाययोजना यासाठी ही पाहणी केली आहे. वाहतूक शाखेच्या सर्व वाहतूक विभागांना या संदर्भात सूचना दिल्या आहे. वेळोवेळी महापालिका, एनएचएआय आदींशी समन्वय साधण्यात येणार असून, शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

– राहूल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.