देहूरोड, दि. 29 (वार्ताहर) – देहूरोड परिसरात दोन मुली करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये 11 व 5 वर्षांच्या दोन मुलींचा समावेश आहे. आतापर्यंत मावळ तालुक्यात एकही करोनाबाधित रुग्ण आढळून आला नव्हता. स्थानिक प्रशासनाने त्यासाठी मोठी खबरदारी घेतली होती. परंतु आज मात्र करोनाने मावळवासीयांवर चाल केली आहे.
मावळ तालुक्यात करोनाने शिरकाव केल्याची ही पहिलीच घटना आहे. परिसरात करोनाबाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. भयभीत वातावरण झाले आहे. चार तासांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्या 50 जणांपैकी 15 जणांना रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. तर 35 जणांना परिसरातील एका मंगल कार्यालयामध्ये क्वॉरंटाइन केल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
प्रशासनाकडून ज्या परिसर हे करोनाबाधित आढळून आले आहेत तो परिसर सील करण्यात आला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाकडून पुढील कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
पुण्यातून आला देहूरोडला करोना
लक्ष्मीनगर, येरवडा येथून भाजीपाल्याच्या टेम्पोत बसून एक कुटुंब देहूरोड येथे सोमवारी (दि. 27) पहाटे आले होते. परिसरात नवीन कुटुंब आल्यानंतर नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली. चार तासांत अनेकजण त्या कुटुंबाच्या संपर्कात आले होते. प्रशासनाला माहिती मिळताच देहूरोड कॅन्टोन्मेंट रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. कोरोनाचे लक्षण आढळून आल्याने त्यांच्या कुटुंबाला तपासणीसाठी पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. बुधवारी (दि. 29) दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे कुटुंबातील अकरा व पाच वर्षांच्या दोन मुलींना करोनाची बाधा झाल्याचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली. प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला आहे. ही घटना घडताच परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अद्यापपर्यंत मावळात एकही रुग्ण नव्हता. करोनाने मावळचे प्रवेशद्वार असलेल्या देहूरोड येथून शिरकाव केला आहे.
देहुरोडला येरवड्याहून आलेले कुटुंब मुळचे कुठले आहे? ते येरवड्यात जिथे रहात होते, ते कोरोना कोरोना बाधित होते का? पूर्वपरवानगी शिवाय व देहूरोड प्रशासनाला न कळव ते देहूरोडला कसे आले?