बीजिंग – जगात करोनाचा संसर्ग आतापर्यंत 30 लाख 80 हजार 101 जणांना झाला आहे. तर कोरोनामुळे 2 लाख 12 हजार 265 जणांना जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 9 लाख 29 हजार 077 जणांनी कोरोनावर मात केली आहे. चीनने महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीमुळे जिम आणि व्यायामशाळा पुन्हा बंद केल्या आहेत. महामारीची दुसरी लाट जर आली, तर चीन उध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
चीनमध्ये जानेवारीमध्ये जिम बंद करण्यात आल्या होत्या, परंतु काही आठवडयांपूर्वी त्यांना अनुमती देण्यात आली होती. चीनमध्ये विदेशातून येणाऱ्या नागरिकांमध्ये करोनाचा संसर्ग दिसून येत आहे. याच कारणामुळे बीजिंगमध्ये येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला सरकारने निश्चित केलेल्या हॉटेल्समध्ये 14 दिवसांपर्यंत क्वारंटाईन केले जात आहे. तर सिंगापूरमध्ये महामारी दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. तेथील रुग्णांची संख्या 14 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. बहुतांश रुग्ण हे विदेशातून आलेले कामगार असल्याचे आढळले आहे.
नागरिकांची मानसिकता सकारात्मक…
आता कोव्हिड19 ची दुसरी लाट थोपवण्यासाठी चीनने नव्याने तयारी सुरु केली आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, नागरिकांच्या वर्तनातील बदल. कोव्हिड19च्या पहिल्या लाटेत किती भयानक नुकसान झाले, ते चीनी नागरिकांनी अनुभवले असल्याने, आता नागरिक स्वत:हून आपल्या वागणुकीत बदल करण्याच्या मन:स्थितीत आले आहेत. ठराविक वेळेतच बाहेर पडणे, कमीतकमी गरजांत दैनंदिन दिनक्रम ढकलणे यासह वैद्यकीय सेवेकडे दुर्लक्ष न करता, त्यांना सहाय्य करणे, अशा गोष्टींसाठी नागरिकांकडून सहकार्य मिळत आहे. तसेच सोशल डिस्टनसिंगचे नियमही नागरिक पाळताना दिसत आहेत. तीन लेअर्सचा मास्क वापरण्यालाही लोक प्राधान्य देत आहेत. दोन व्यक्तींमध्ये एक मीटरचे अंतर न पाळणाऱ्या अथवा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना आर्थिक दंड जागेवर ठोठावण्यात येत आहे.
शासनाच्या उपाययोजना…
सरकारनेही रस्ते, फूटपाथ, सार्वजनिक ठिकाणे अशा विविध ठिकाणी सॅनिटायझर डिस्पेन्सर्स बसवण्यात आले असून, शहर, सोसायटी आणि नागरी परिसरांतील “हायजिन लेव्हल’ कायम ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामध्ये म्युनिसिपल सॉलिड वेस्ट अर्थात घनकचरा व्यवस्थापन आणि क्वारन्टाईन कक्ष उभारणी, संशयित रुग्णांसाठी तपासणी केंद्रे आणि पीपीई किटची वितरण यंत्रणा उभी करणे, यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्याच्या जोडीला वैद्यकीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.