आमदार लांडगेंच्या पत्नीचा समावेश
पिंपरी – भोसरी विधानसभा मतदार संघातून 20 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी दोघांचे उमेदवारी अर्ज बाद झाले असून त्यात आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजा यांच्या अर्जाचा समावेश आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघासाठी नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत 20 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केले. शनिवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यापैकी दोन उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. आमदार लांडगे यांच्या पत्नी पूजा यांनी भाजपकडून डमी उमेदवारी अर्ज सादर केला होता. तसेच अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केला केला होता. मात्र, “ए’ “बी’ फॉर्म नसल्याने तसेच अपक्ष म्हणून दहा प्रस्तावक नसल्याने हा अर्ज बाद ठरविण्यात आला.
तसेच हमारी अपनी पार्टीच्या वतीने राजवीर पवार यांनी अर्ज सादर केला होता. राजवीर पवार हे खेडचे मतदार आहेत. मात्र, त्यांनी तेथील मतदार यादीचा दाखला सादर केला नाही. त्यामुळे त्यांचाही अर्ज बाद ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रेश्मा माळी यांनी दिली. उर्वरित 18 उमेदवारांचे 24 अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. चार उमेदवारांनी पक्षासह अपक्ष म्हणूनही अर्ज सादर केले आहेत.