भोर – कोरनाच्या भीतीमुळे अनेकजण धास्तावले असताना त्याचा फटका पोल्ट्री व्यवसायिकांना बसत असल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. पोल्ट्री व्यावसायिक यामुळे कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे या व्यवसायिकांना सरकारच्या वतीने अनुदान स्वरूपाने मदत मिळावी अशी मागणी भोर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायिकांनी केली आह.
बुधवारी (दि. 11) भोर तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी गेल्या 10 वर्षांपासून सुरेश ऍग्रो अँड पोल्ट्री या कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास 55 पोल्ट्री व्यावसायिकांशी करार पद्धतीने कोंबडीची पिल्ले खाद्य, औषधे, पुरविले जातात. त्यांची विक्री ही केली जाते. या व्यवसायावर अनेक कुटुंबिय अवलंबून आहेत. सध्या करोना व्हायरसबाबतच्या विविध प्रकारच्या अफवांमुळे चिकनचा खप कमी झाला आहे. 5 रुपये किलोनेही ग्राहक चिकन घेत नसून कोंबड्या कौडीमोल भावाने द्याव्या लागत आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होत आहे.
पोल्ट्री व्यवसायावर असणारी सर्वच कुटुंबे आर्थिक अडचणीत आली आहेत, तेव्हा अशा व्यवसायधारकांना सरकारच्या वतीने मदत मिळावी अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिक विनोद बोडके, संपत साळुंखे यांनी निवेदनाद्वारे प्रांत अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, सभापती श्रीधर किंद्रे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांच्याकडे केली आहे.