औषध आणि खाद्यपदार्थाची दुकाने वगळता सर्व बंद
नवी दिल्ली : इटलीमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात आहे. औषध आणि खाद्यपदार्थाची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
देशात गेल्या 2 आठवड्यात कोरोना विषाणूमुळे 827 जणांचा मृत्यू झाला असून गेल्या 24 तासात 200 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे एका दिवसात मरणाऱ्यांची संख्या आतापर्यंत सर्वात मोठी आहे. इटलीचे पंतप्रधान गिउसेप कॉन्टे यांनी सर्व किरकोळ दुकाने, कॉफी बार, पब, रेस्टॉरंट्स आणि ब्युटी सलून बंद करण्याची घोषणा केली आहे.तसेच खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी देशाला दिलेल्या संदेशात ते म्हणाले की, आता एक पाऊल पुढे टाकण्याची वेळ आली आहे. सरकारने देशातील 6 कोटी लोकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. फक्त आवश्यक काम असल्यास घराबाहेर पडा.
इटलीच्या सरकारने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील दळणवळणावर बंदी घातली आहे. पूर्वी ही बंदी उत्तर इटलीवर लागू होती. इटलीच्या मिलान, रोम आणि वेनिसमध्ये बंदीमुळे शांतता आहे.
कोरोनाच्या वाढत्या उद्रेकदरम्यान, इटलीच्या नागरी संरक्षण विभागाचे प्रमुख एंजेलो बोरेली म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमावलेल्या 90 टक्के लोकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहे.
सहा कोटी लोकसंख्या असलेल्या इटली देशाने विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी निर्बंध घातले आहेत.सर्व खेळांचे कार्यक्रम रद्द करण्याबरोबरच शाळा, विद्यापीठे, चित्रपटगृह आणि संग्रहालये बंद केली आहेत. स्पेन आणि पोर्तुगालसह अनेक देशांनी इटलीला जाणारी विमान वाहतूक आणि रस्ते प्रवासावर बंदी घातली आहे.