- गुन्हेगारांची पळापळ ः 92 गुन्हेगार तपासले, त्यामध्ये 20 जणांना अटक
पिंपरी – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आयुक्तालयाच्या हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत कोम्बिग ऑपरेशन केले. गुन्हे शाखेच्या सर्व युनिट आणि पथकांनी संयुक्तपणे या कारवाईमध्ये सहभाग घेत 92 गुन्हेगार तपासले, त्यामध्ये 20 जणांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीचाही समावेश आहे.
शनिवारी (दि. 29) पहाटे एक ते साडेचार या कालावधीत पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची पाच पथके, खंडणी/दरोडा विरोधी पथक, आर्थिक/अंमली पदार्थ विरोधी या पथकांनी ऑपरेशन ऑल आऊटमध्ये सहभाग घेतला. साडेतीन तासात पोलिसांनी 92 गुन्हेगार चेक केले. त्यात पोलिसांना रेकॉर्डवरील 20 गुन्हेगार आढळून आले. या गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
सर्व आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. 17 गुन्हेगारांना प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी पिंपरी पोलिसांकडे देण्यात आले आहे. तर दोघांना निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला विकास उर्फ बारक्या गायकवाड (वय 19) हा आरोपी सापडला. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी तळेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलिसांची अचानक ऑपरेशन “ऑल आऊट’ सुरू केल्याने शहरातील गुन्हेगारांची एकच पळापळ झाली. रविवारी होणाऱ्या मोर्चा आणि सभेच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहे. रविवारी पहाटेही अशाच प्रकारे कारावाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळीही पोलिसांनी अशाच प्रकारे ऑपरेशन ऑल आऊट राबविले होते.