पिंपरी – चिंचवडगाव येथे चार बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली. ही घटना शनिवारी (दि. 29) सकाळी उघडकीस आली.
पोलिसांनी या बॉम्ब सदृश्य वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साफसफाई करीत असताना एका महिलेला रिक्षाच्या मागे अडगळीत बॉम्बचा आकार असलेल्या चार लोखंडी वस्तू दिसल्या. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. काही वेळातच बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पाचारण करण्यात आले.
त्यांनी पाहणी केल्यानंतर हे ब्रिटिशकालीन निकामी बॉम्ब असल्याचे उघड झाले. मात्र, हे बॉम्ब या ठिकाणी आले कसे याबाबत माहिती मिळू शकली नाही. याबाबत पोलिसांनी लष्कराला कळविले आहेत. तोपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब सदृश्य वस्तू जमिनी गाडून ठेवल्या आहेत. लष्कराचे पथक आल्यावर ते या बॉम्ब सदृश्य वस्तूची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करतील.दरम्यान, चिंचवडमध्ये बॉम्ब सापडल्याची माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.