पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील बसमध्ये प्रवास करत असताना हेडफोन, इयरफोन शिवाय मोबाइलवर ऑडिओ व व्हिडीओ ऐकण्यास, बघण्यास तसेच मोबाइलवर मोठ्या आवाजात बोलण्यास प्रवाशांना मनाई करण्यात आली आहे. मोबाइलवर ऑडिओ व व्हिडीओ पाहताना हेडफोनचा वापर करा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे व पिंपरी-चिंचवड शहर, शहरांलगतची उपनगरे व ग्रामीण भागात, पीएमआरडीए कार्यक्षेत्रामध्ये बससेवा पुरविण्यात येते. सध्या परिवहन महामंडळाकडून ३९६ बस मार्गांवर दररोज सरासरी १७८५ बस संचलनात असून सरासरी १३ लाखांपेक्षा अधिक प्रवाशी प्रवास करतात. प्रवासादरम्यान काही मार्गांवर प्रवास करणारे प्रवाशी मोबाइलवर हेडफोन व इयरफोन शिवाय ऑडिओ, व्हिडीओ पाहताना मोठा आवाज ठेवतात.
त्यामुळे बसमध्ये इतर प्रवाशांना नाहक त्रास होत असल्याच्या तक्रारी महामंडळाकडे प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाकडून बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोबाइलवर ऑडिओ, व्हिडीओ ऐकताना, पाहताना हेडफोनचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच कंडक्टर कडून तिकीट घेताना हेडफोनचा वापर करू नये, अशा सूचना देण्यात आल्या असून सदरील नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.