पिंपरी,(प्रतिनिधी) – रावेत मेट्रो इको पार्कची जागा ही बनावट पंचनामा करून निवडणूक आयोग व सरकारची फसवणूक करून हस्तांतरित केली गेली. तसेच तेथे निवडणूक आयोग स्वतः अनधिकृत बांधकाम करत आहे. त्यासाठी अवैध वृक्षतोड करत आली आल्याच्या निषेधार्थ रविवारी (दि. ११) निषेध मुंडन करण्यात येणार आहे.
रावेत मेट्रो इको पार्क गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. परिणामी तेथील झाडे पाण्याअभावी जळत आहेत. सर्व गोष्टीकडे पालिका, पोलीस व जिल्हाधिकारी कार्यालय जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पाण्याअभावी झाडे मारली जात आहेत व तेथील जैवविविधता नष्ट केली जात आहे. ही झाडे जगविण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले असून मेट्रो इको पार्क शनिवारपर्यंत सर्वासाठी खुला करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
शनिवारी हे पार्क खुले न केल्यास रविवारी (दि. ११) प्रशासनाचा निषेध मुंडन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी १० वाजता होणार आहे, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.