बीड – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी छावणी मालकांशी चर्चा केली. छावणी मालक छावणी बंद करणार होते. परंतु पवारांशी चर्चा केल्यानंतर चारा छावणी बंद करण्याच्या निर्णयास मालकांनी तूर्तास स्थगिती दिली आहे.
शरद पवार सध्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळी भागांना ते भेट देत आहेत. पवारांनी आज बीडमधील चारा छावणीला भेट दिली. चारा छावणीच्या मालकासोबतच्या भेटीनंतर पवारांनी माध्यमांशी चर्चा करताना सांगितले की, छावणी मालक छावणी बंद करणार होते. परंतु मी त्यांना विनंती केली की छावणी बंद करु नका, आता ते थांबायला तयार आहेत.
पवार म्हणाले, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क केला. येत्या चार-पाच दिवसात मी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. या भेटीत मी त्यांच्यापुढे दुष्काळासंबधीचे सर्व प्रश्न मांडेन. राज्य आणि केंद्र सरकारकडे सहायतेसाठी आग्रह करणार आहे, असे त्यांनी सांगितले.