उमेश सुतार
दिवाळीत बॅंकांना चार दिवस सुट्टी
दिवाळीच्या कालावधीत महिन्या अखेर असल्याने नागरिकांना बॅंकांच्या खात्यावरुन व्यवहार करणे अपरिहार्य होणार आहे. बॅंकांना दिवाळी सण आणि चौथा शनिवार यामुळे सलग चार दिवस सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे या कालावधीत तब्बल चार दिवस बॅंका बंद राहणार असल्याने ग्राहकांसोबतच अनेक व्यापाऱ्यांचीही गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
कराड – दिवाळी काही दिवसांवर आली असली तरी कराड, पाटण तालुक्यात दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठा सजल्या असल्या तरी निवडणुकीच्या धामधुमीत ग्राहकांनी दुकानाकडे पाठ फिरकल्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूकीमुळे मागच्या आठवड्यात सर्वत्र प्रचार व रॅली यांचेच वातावरण दिसत होते. दिवाळी आता फक्त तीन दिवसांवर येऊन ठेपली असली तरीही बाजारपेठेतील धावपळ आणि उलाढाल होताना पहावयास मिळत नाही.
दिवाळी सणासाठी लागणारे साहित्य व्यापारीवर्गाने आपल्या गोडावूनसह दुकानांमध्येही लाखो रुपये खर्चून माल भरला असला तरी दुकानाकडे ग्राहकच फिरकलेले नाहीत. शाळांना सुट्टी लागल्याने बाजारपेठेत गर्दी वाढेल. असा अंदाज होता. मात्र परतीच्या पाऊस कोसळत असल्याने सध्या बाजारपेठेत ग्राहक यायला धजवत नाही. यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. नोकरदारांचे पगारही लवकर होण्याची शक्यता कमी असल्याने तसेच खासगी क्षेत्रात मंदीचे ढग असल्याने बोनसचाही ठिकाणा नसल्याने दिवाळी खरेदीसाठी नागरिकांनी अक्षरश: आखडता हात घेतला आहे.
दिवाळी येण्यापूर्वीच 15 ते 20 दिवस बाजारपेठा दिवाळीच्या सामानांनी, लाईटस व कपड्यांनी फुलून जात होते. यंदा मात्र बाजारपेठेत कमालीची मंदी असल्याचे कराड, पाटण तालुक्यातील सर्व व्यापारी आता खुलेआम बोलू लागले आहेत. एकतर बाजारात असलेली अभूतपूर्व मंदी आणि दिवाळीच्या तोंडावर आलेली निवडणूक यामुळे बाजारात एक प्रकारची मरगळ आल्याचे जाणवत आहे. 24 ऑक्टोबरला निकाल लागल्यानंतर मात्र या बाजारपेठांमध्ये गर्दी होईल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे.