पिंपरी, दि. 6 (प्रतिनिधी) – शहरातील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून घेतलेल्या व उपचार घेतलेल्या रिक्षाचालकाला करोनाची बाधा झाल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या रिक्षाचालकाची शस्त्रक्रिया करणारे, उपचार करणारे तसेच या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 42 डॉक्टर, 50 कर्मचारी व शिकाऊ डॉक्टरांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच या रिक्षाचालकाच्या संपर्कात आलेल्या इतरही व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत तब्बल 21 जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 12 जण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले असून, उर्वरित 9 जणांना उपचार सुरू आहे. त्यापैकी 8 जणांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात तर एकावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शहरातील करोनाचे संकट काहीसे कमी होत असतानाच दिल्लीतील धार्मिक परिषदेला हजर राहिलेल्या काही व्यक्ती व त्यांच्या संपर्कात आलेल्यांना करोनाची लागण झाल्याने शहरातील बाधितांचा आकडा वाढला आहे.
त्यातच आणखी धक्कादायक घटना आज (सोमवार) उघडकीस आली. 31 मार्च रोजी रिक्षाचालक असलेल्या एका व्यक्तीचा कासारवाडी येथे अपघात झाला होता. त्याच्या पोटाला दुखापत झाल्याने त्याला एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. परंतु, त्याच्या पोटाला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतर या व्यक्तीमध्ये ताप, सर्दी आणि खोकला याची लक्षणे आढळली.
त्यामुळे संबंधिताचे रिपोर्ट हे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठविण्यात आले. हे रिपोर्ट पाहिल्यानंतर संबंधिताच्या घशाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या रुग्णाला करोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. संबंधितावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस, सहायक कर्मचारी व शिकाऊ डॉक्टर मिळून 92 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
आज उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रुग्णसेवा देणाऱ्या व्यक्ती आणि डॉक्टरच अडचणीत आल्यामुळे संपूर्ण रुग्णालयात अस्वस्थतेचे वातावरण पहायला मिळाले. तर सर्वच विद्यार्थी, कर्मचारी, डॉक्टरांनी या प्रकाराचा धसका घेतल्याचे दिसून आले.
इतरांचाही शोध घेण्यास सुरुवात
संबंधित करोनाबाधित इसम हा रिक्षाचालक असल्यामुळे तो आणखी कोणा-कोणाच्या संपर्कात आला याची माहिती घेण्यास पालिका व पोलीस प्रशासनाने सुरुवात केली आहे. कुटुंबीय तसेच रिक्षात प्रवासी म्हणून कोणी प्रवास केला का? याबाबतही माहिती घेण्यास तसेच या व्यक्तींचा शोध घेण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
47 जणांच्या घशातील द्रवाची तपासणी – आयुक्त
42 डॉक्टर आणि 50 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यातील 47 जणांच्या घशातील द्रवाची तपासणी करण्यासाठी नमुने देण्यात आल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर नक्की प्रकार समोर येईल, असे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे.