जेजुरी – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुलदैवत खंडेरायाच्या गडकोट आवारातील मुख्य मंदिराच्या समोर रविवारी (दि. 6) रात्री 9 वाजता सुमारे 1150 दिवे लावून खंडेरायाला प्रार्थना करण्यात आली. तर शहरवासीयांनी दिवटी पेटवत मल्हारी मार्तंडांचा जयजयकार करीत आराधना केली.
कुलदैवत खंडेराया हे अवघ्या बहुजन बांधवांचे लोकदैवत असून. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे देवदर्शन बंद असले तरी केवळ पाच पुजारी, सेवेकरी यांच्यावतीने श्रींचे नित्याचे धार्मिक विधी सुरू आहेत. रविवारी (दि. 6) श्रींची पूजा अभिषेक व शेजआरती झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देवसंस्थानचे विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी, सेवेकरी यांच्यावतीने मुख्य मंदिरासमोर कासवावर सुमारे 1150दिवे लावण्यात आले. जेजुरी शहरवासीयांनी सुद्धा दिवटी पाजळवून श्रींचा जयजयकार करीत अवघे विश्व करोना मुक्त कर, अशी प्रार्थना केली.