पिंपरी – बाजारात खरेदी करत असताना खिशातून मोबाइल चोरण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात येताच तरुणाने फोन सुरक्षित ठेवला. यामुळे चिडलेल्या दोघांनी मिळून मारहाण करत तरुणाकडून जबरदस्तीने दीड हजारांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 28) सायंकाळी शिवाजी चौक, हिंजवडी येथे घडली.
नितीन कृष्णा माने (वय 32, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी रविवारी (दि. 28) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजता हिंजवडी येथील शिवाजी चौकात खरेदी करत असताना त्यांच्या पाठीमागच्या खिशातून कोणीतरी मोबाइल फोन चोरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी मोबाइल फोन मागच्या खिशातून समोरच्या खिशात ठेवला.त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती फिर्यादी यांच्याजवळ आला. त्याने फिर्यादी यांच्या खिशातून जबरदस्तीने मोबाइल फोन काढण्याचा प्रयत्न करत हातातील कड्याने मारहाण केली. त्यानंतर आरोपीचा दुसरा साथीदार फिर्यादी यांच्याजवळ आला. त्याने फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या खिशातून दीड हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली.