जुन्नर – संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दिवसभरात सुमारे 70 ते 80 हजार भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे 4 वाजता देवस्थान ट्रस्टचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, विश्वस्त गोविंद मेहेर, प्रभाकर जाधव, प्रभाकर गडदे, मच्छिंद्र शेटे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविक भक्त उपस्थित होते. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. याप्रसंगी देवस्थानास सुप्रसिद्ध उद्योजक जयंत दत्तात्रय म्हैसकर (रा. मुंबई) या भाविकाकडून 1 लाख रुपयाची देणगी देण्यात आली.
भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते तसेच भाविकांकरीता विविध सेवा सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. सायंकाळी मंदिरात श्री मुक्ताई भजनी मंडळ, शिवेची वाडी यांचे भजन झाले. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.