प्रभाग 16 मधील परिस्थिती, नागरिकांची मुस्कटदाबी
मेढा (प्रतिनिधी) – मेढा नगरपंचायत प्रशासनाने अनेक प्रभागांमधील विकासकामांना शुभारंभ केला आहे. मात्र, काही प्रभागांमध्ये प्रशासनाने अजूनही पथदिवे, रस्ते या मूलभूत गरजांपासून नागरिकांना वंचित ठेवले आहे. दरम्यान, नागरिकांनी संबंधित गरजांसाठी लोकप्रतिनिधींकडे तक्रार केल्यावर नगरसेवकांच्या कुटुंबियांकडून धमकी देण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे मेढ्यातील नागरिक त्रस्त असून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
मेढा शहराच्या विस्तारामुळे अनेक ओसाड जागांच्या ठिकाणी मोठमोठ्या लोकवस्त्या तयार झाल्या आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी केवळ मतांसाठीच प्रभागात फिरत असल्याची तक्रार येथील नागरिक करत आहेत. प्रभाग
16 मधील केवळ स्मशानभूमीचा रस्ता प्रशासनाने मंजूर केला आहे. मात्र, शासकीय विश्रामगृहाशेजारी या मोठ्या लोकवस्तीत डांबरी रस्ता केवळ स्वप्न राहिला आहे. येथे पथदिवे आहेत.
मात्र, त्यांना वीज कनेक्शन जोडले नसल्याने येथील नागरिकांना कायम अंधारातच रहावे लागत आहे. याबाबत संबंधित लोकप्रतिनिधींकडे तक्रार केल्यास त्यांच्या कुटुंबीयांकडून नागरिकांची मुस्कटदाबी होत आहे. त्यामुळे येथील नागरिक नक्की लोकशाहीत जगत आहेत की हुकूमशाहीत, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
मेढ्यातील प्रभाग 16 अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेच. याबाबत आम्ही सोशल मीडियावर आवाज उठवला तर नगरसेवकांच्या कुटुंबियांकडून धमकी देऊन आमची मुस्कटदाबी करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींकडून अशी उत्तरे मिळत असतील तर आम्ही तक्रार कुणाकडे करायची. प्रशासनाने दखल घेऊन आमच्या समस्या सोडवाव्यात.
संतोष सागवेकर,