सांगली-इस्लामपूर रस्त्याची अवस्था दयनीय

प्रशासनाचे दुर्लक्ष
वाहनधारकांमधून दुरुस्तीची मागणी
कविता शेटे
सांगली – सांगली-इस्लामपूर रस्त्याची अवस्था अत्यत दयनीय झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. मुंबई, पुणेकडे जाणारी वाहतूक इस्लामपूर मार्गे होत असते. या मार्गावर सतत रहदारी असते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता खराब झाला आहे. यामुळे वाहनधारक, प्रवासी मेटाकुटीला येत आहेत. दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करुन वाहनधारकांसह प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

सांगलीत ऑगस्ट महिन्यात महापूर काळात हा रस्ता पाण्याखाली होता. त्यामुळे या रस्त्यावरील डांबर उखडले आहे. रस्त्यावर असणाऱ्या दुभाजकांची पाण्याच्या प्रवाहामुळे नासधूस झाली आहे. यामुळे या मार्गांवरून वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. या दुभाजकांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून वारंवार होत आहे. सांगली – इस्लामपूर रस्त्यावर दुरुस्तीसाठी ठिकठिकाणी मुरूम, खडी टाकण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गांवर जागोजागी पाण्याच्या पाइपलाइनसाठी रस्त्याची खुदाई करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील अपघातात वाढ झाली आहे. याकडे लक्ष देऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुंग ते इस्लामपूर दरम्यान काही प्रमाणात रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. परंतु सांगली ते तुंग दरम्यानच्या रस्त्याची अवस्था दयनीय असल्याने हा रस्ता अजूनही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. शिवाय महापुराच्या काळात या रस्त्यावर गाळ माती साचल्यामुळे डांबर उघडले गेले आहे.

इस्लामपूरकडून सांगलीकडे जाण्यासाठी व सांगली ते पुणे, मुंबईकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर होतो. अवजड वाहने, मालवाहतूक, महामंडळची एस. टी. खासगी वाहने, ऊसाच्या गाड्यांची वाहतूक याच रस्त्यावर होत असते. त्यामुळे हा रस्ता वारंवार चर्चेचा विषय ठरत असतो. लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी केली नाही तर या रस्त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य अपघाताला निमंत्रण देणारे ठरतील दुचाकी वाहनधारकांना रस्त्यावरून खड्डा चुकवत प्रवास करावा लागत आहे.

सांगली-इस्लामपूर हा रस्ता राष्ट्रीय महामार्गास जोडणारा रस्ता असल्याने रस्त्याचे आधुनिकीकरण होणे आवश्‍यक आहे. हा महत्वाचा प्रश्‍न वारंवार समोर येत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना रस्त्यावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही मोजकीच गावे या रस्त्या लगत आहेत रस्त्याच्या दुतर्फा शेती क्षेत्र आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी हा रस्ता अगदी निर्मनुष्य असतो. रात्रीच्या वेळी प्रवास करताना सोयीचे व्हावे यासाठी या रस्त्यावर दिवाबत्तीची सोय होणे गरजेचे आहे. तसेच या मार्गाचे सुशोभीकरण व्हावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लवकरात लवकर या रस्त्याच्या डांबरीकरणाची व आधुनिकीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.