- प्रशासनाचे दुर्लक्ष ः नागरिकांची होतेय लूट
भोसरी – करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण खबरदारी घेत आहे. त्यासाठी मास्क, सॅनिटायझर खरेदीसाठी शहरात नागरिकांची धावपळ सुरू आहे. उपाययोजनेसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांना जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत. मेडिकलमध्ये या साहित्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिक बचाव करण्यासाठी रस्त्यावर मास्क विक्री करणारांकडून खरेदी करत आहेत. अशा मास्कची खरेदी करणे कितपत सुरक्षित आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
भोसरीमधील महापालिकेच्या दवाखान्यासमोरच एका कपडेविक्रेत्याने हातगाडीवरच एक लांबलचक रस्सी बांधून त्याला मास्क लटकावून विक्री सुरू केली आहे. हे मास्क उघड्यावरच ठेवले जात आहेत. त्यामुळे हवेतील इतर जीवजंतू त्यावर बसून नागरिकांना आजार होऊ शकतात. तसेच विक्री करणारे देखील स्वच्छतेची काळजी घेत नसल्याने अशा ठिकाणाहून मास्कची खरेदी करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. इतर वेळी असे मास्क दहा-वीस रुपयांना मिळतात. परंतु करोनामुळे अशा साध्या मास्कची किंमतही दुप्पट वाढली आहे. त्यामुळे नागरिकांची एक प्रकारे लूट होत आहे. अशा गोष्टींवर प्रशासनाने लक्ष ठेवणे गरजेचे असताना ते दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नागरिकांची अडवणूक करून पैसे कमावणारांची संख्या वाढू लागली आहे.
आरोग्य विभागाने करावाई करावी
नागरिकांची लूट करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी. मेडिकलमध्येदेखील दुकानदार मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा दाखवून नागरिकांची लूट करत आहेत. परंतु याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहे. शहरात मेडिकलवाले मास्क, सॅनिटायझरसाठी डॉक्टरांची चिट्टी घेऊन या असे बोलत असल्याने ग्राहकांची अडवणूक करून डॉक्टर, मेडिकलवाले लूट करत आहेत, अशी परिस्थिती शहरात दिसून येत आहे. त्यामुळे नागरिक मेडिकलपेक्षा भर रस्त्यात उघड्यावर मास्क विक्री करणारांकडून खरेदी करत आहेत. परंतु ते आरोग्याला वर्धक ठरण्यापेक्षा घातकच जास्त ठरत आहे. अशी मेडिकलविना फुटपाथवर मास्कची विक्री करण्यासाठी परवानगी आहे का? अशा पद्धतीने मास्कची, औषधांची विक्री करणारांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
विक्रेते घेत नाहीत काळजी
भोसरी येथे महापालिकेच्या दवाखान्यासमोर एक मास्क विक्रेता तोंडात गुटखा भरून रस्त्यावर पिचकाऱ्या मरत आहे. परिसर स्वच्छ ठेवत नाही. अशा ठिकाणी उघड्यावर विक्रीसाठी ठेवलेले मास्क खरेदी करणे कितपत योग्य आहे. ते स्वतः करोनाविषयी सतर्क नाहीत. ते तोंडाला मास्क लावत नाहीत. रस्त्याची सर्व धूळ त्या मास्कवर बसत आहे. अशा ठिकाणावरून मास्क खरेदी केली तर आरोग्य अबाधीत राहण्यापेक्षा बाधित होण्याची जास्त शक्यता आहे. तेव्हा ग्राहकांनी, नागरिकांनी अशा ठिकाणावरून मास्कची खरेदी करू नये.