लुधियाना – पंजाबातल्या लुधियानात विदेशातून आलेल्या 167 संशयितांची करोना चाचणी घेण्याच्या आधीच हे रूग्ण गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. शहराचे सिव्हील सर्जन डॉ. राजेश बग्गा यांनी सांगितले की यातील 29 जणांचा शोध लागला आहे पण बाकीचे मात्र गायबच आहेत.
पंजाब सरकारकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना विदेशातून भारतात आलेल्या व्यक्तींची यादी देण्यात आली आहे. या यादीतील रूग्णांची करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चाचणी केली जाणे अपेक्षित होते. त्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लुधियानातील या व्यक्तींचा शोध घेतला असता त्यातील 167 जणांचा ठावठिकाणाच त्यांना आढळून आला नाही.
या बेपत्ता व्यक्तींना शोधून काढण्याचे काम आता पोलिसांवर सोपवण्यात आले असून पोलिसांनी दोन पथके स्थापन करून त्यांचा शोध सुरू केला आहे. यातील काही व्यक्ती वैद्यकीय अधिकाऱ्यांना आढळून आल्या आहेत पण बाकीचे मात्र गायबच आहेत. त्यांना शोधण्याचे काम आता पोलिस करीत आहेत. हे संशयित आढळून न येण्याचे प्रमुख कारण असे आहे की त्यांनी आपल्या पासपोर्टवर चुकीचा पत्ता दिला आहे आणि काहींचे फोन नंबर चुकीचे आहेत असे आढळून आले आहे. तथापी या लोकांना त्वरीत शोधून त्यांची चाचणी घेतली जाईल असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.