ओझरे येथील बंधारा, पुल दुरूस्ती करणार
रेडा- इंदापूर तालुक्यातील ओझरे हे शेवटचे गाव. यापलीकडे माळशिरस तालुका सुरू होतो. ओझरेकरांचे शाळा, विद्यालय, आरोग्य सुविधा, व्यापार यासाठीचे दळणवळण हे बऱ्यापैकी अकलुजशी जुळलेले आहे. परंतु, येथील पुलाची दुरवस्था झाल्याने दळणवळणात अडथळा येत आहे. याबाबतची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रविण माने यांनी अधिकारी, कार्यकर्त्यांसह हे गाव गाठले. येथे पाहणी केल्यानंतर बंधारा तसेच रस्त्याचे काम तातडीने केले जाईल, असे सांगितले. यामुळे येथील ग्रामस्थांनी याचे स्वागत केले आहे.
ओझरे येथील बंधारा, रस्त्याची पाहणी सभापती माने यांच्यासह इंदापूर मार्केट कमिटीचे संचालक सचिन देवकर, नाथाआबा रुपणवर, सुनिल भाऊ पालवे, अमोल मोहिते, दिलीप रास्ते, विलास रास्ते, अर्जुन पालवे, अशोक शिंदे, नवनाथ शिंदे, हरी पवार, महादेव रास्ते, वजीर रास्ते, शरद पालवे, दत्ता ढेरे तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभापती माने म्हणाले की, पुण्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने, मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या विसर्गामुळे इंदापूर तालुक्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतून ओझरे येथे निरा नदीवर असलेला कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने रस्ताही खचला आहे. पाऊस तसेच पूरस्थिती कमी होताच येथील कामे केली जातील, असे सभापती माने यांनी सांगितले.