पिंपरी(प्रतिनिधी) – महापालिकेच्या “अ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणारा विभाग सध्या करोनाच्या दृष्टीने सर्वाधिक “हॉटस्पॉट’ ठरत आहे. या विभागात सध्या 40 सक्रिय रुग्ण आहेत. तर, पाच आणि पाचपेक्षा कमी रुग्ण संख्या “ब’, “ड’, “ग’ आणि “ह’ या क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या विभागात पाहण्यास मिळत आहेत.
बुधवारी (दि. 20) रात्रीपर्यंत क्षेत्रीय कार्यालयनिहाय मिळालेल्या माहितीनुसार, “अ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या भागामध्ये सर्वाधिक 40 सक्रिय रुग्ण आहेत. आकुर्डी गावठाण, शाहूनगर, संभाजीनगर, चिंचवडस्टेशन, आनंदनगर, मोरवाडी, विजयनगर, उद्योगनगर, भाटनगर आदी प्रमुख भागांचा त्यामध्ये समावेश आहे.
त्या खालोखाल 15 रुग्ण “ई’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या परिसरात आहेत. डुडुळगाव, चऱ्होली, दिघी, मोशीचा काही भाग, बोपखेल आदी भागांचा त्यामध्ये समावेश आहे. “क’ आणि “फ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या परिसरात अनुक्रमे 10 आणि 11 सक्रिय रुग्ण आहेत. “क’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत पिंपरी, भोसरी आणि चिखली व मोशीचा काही भाग येतो. तर, “फ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत तळवडे, निगडी आणि चिखलीच्या काही भागाचा समावेश होतो.
चार क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अत्यल्प रुग्णसंख्या महापालिकेच्या “ब’, “ड’, “ग’ आणि “ह’ या क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या भागात सध्या करोना सक्रिय रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. संबंधित भागांमध्ये पाच आणि पाचपेक्षा कमी रुग्ण हे करोना सक्रिय आहेत. क्षेत्रीय कार्यालयनिहाय स्थिती : ब (मामुर्डी, किवळे, रावेत, चिंचवड आदी भाग) : 4, ड (पुनावळे, ताथवडे, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरवचा काही भाग, रक्षक सोसायटी, पिंपळेनिलख) : 5, ग (थेरगाव, रहाटणी) : 4, ह (दापोडी, सांगवी, औंध हॉस्पिटल, पिंपळे गुरवचा काही भाग) : 5.