वाघोली-राजकीय, सामाजिकदृष्ट्या सक्रीय असणाऱ्या वाघोली गावातील ३७ वर्षीय ग्रामपंचायत सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. खाजगी लॅबमध्ये कोरोनाची टेस्ट पॉजिटीव्ह आल्याने या सदस्याला पुढील उपचारासाठी पुणे शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सक्रीय ग्रामपंचायत सदस्याला कोरोनाची लागण झाल्याने वाघोली परिसरातील नागरिकांना धक्काच बसला आहे.
ग्रामपंचायत सदस्याला सर्दी व घश्यामध्ये थोडा त्रास जाणवू लागल्याने खाजगी लॅबमध्ये कोरोनाची टेस्ट केली होती. बुधवारी (दि.२०) संध्याकाळी उशिरा टेस्टचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला. वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने सदस्याला पुढील उपचारासाठी पुणे शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबातील व संपर्कात आलेल्या ११ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. औषध फवारणी करून वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सर्व्हे करण्यात येत आहे.
सामाजिक व राजकीय दृष्ट्या सक्रीय असणाऱ्या या सदस्याला कोरोनाची लागण झाली असल्याने सर्वांनाच धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाघोलीतील इतर राजकीय नेत्यांची देखील धाकधूक वाढली आहे. वाघोलीत आत्तापर्यंत १० कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी ६ जण बरे होऊन घरी परतले आहेत. इतर चौघांची प्रकृती स्थिर आहे. प्रशासनाकडून वाघोली परिसरातील नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे अशा सुचनाही प्रशासनाच्या वतीने नागरिकांना देण्यात आल्या आहेत.