वृद्ध दाम्पत्याला हातोडीने मारहाण

  • मारहाणीबाबत गूढ : कोंढापुरीत चर्चेला उधाण

शिक्रापूर, दि. 5 (वार्ताहर)- कोंढापुरी (ता. शिरुर) येथे कवडीमाळ वस्तीवरील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याला रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करून हातोड्याने मारुन अनोळखी इसमांनी गंभीर जखमी केले. या घटनेत चोरी न झाल्याने या गुन्ह्याचे गुढ उकलण्यास शिक्रापूर पोलिसांनी सुरुवात केली आहे. याबाबत चर्चेला उधाण आले आहे. याबाबत जनार्दन जयवंत गायकवाड (वय 65, रा. कोंढापुरी, कवडीमळा, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून पोलिसांनी दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, जनार्धन जयवंत गायकवाड व मंदा गायकवाड हे दाम्पत्य कोंढापुरी येथे राहत आहे. त्यांचा मुलगा संजय हा बाजुलाच वेगळा रहात आहे. गायकवाड दाम्पत्य हे रात्रीच्या सुमारास घराची कडी लावून झोपले होते. त्यावेळी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी गायकवाड यांच्या घराचा दरवाजा लाथ मारुन उघडला. घरात प्रवेश केल्यानंतर एकाच्या हातात हातोडी. तर दुसऱ्याच्या हातात कोयता होता. त्या दोघांनी या दाम्पत्याला डोक्‍यामध्ये हातोडीने व कोयत्याने मारुन जखमी केले. तेव्हा या दाम्पत्याने आरडाओरडा केल्यानंतर एका आरोपीने जनार्धन गायकवाड यांना छातीवर दगड मारला. तेव्हा शेजारील आरडाओरडा ऐकून गायकवाड यांचा पुतण्या मदतीसाठी आला. त्यावेळी आरोपी लगेचच पळून गेले. त्यांनतर गायकवाड दाम्पत्याला उपचारासाठी शिक्रापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु घटनेत दोन्ही अनोळखी आरोपींनी कुठलीही चोरी न करता मारहाण केल्याने याबाबत गुढ वाढले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.