बंगळुरू – कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारमधील ११ आमदारांनी आज कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. या राजीनामा सात्राने संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळामध्ये भूकंप घडवून आणला असून राजकीय जाणकारांमध्ये कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकार पडणार की तरणार याबाबत चर्चा सुरु आहेत. अशातच आता आज राजीनामा सादर केलेले कर्नाटकातील काँग्रेस आमदार बी सी पाटील यांनी याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती दिली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबत बी सी पाटील यांच्या हवाल्याने सदर वृत्त दिले असून या वृत्तानुसार राजीनामा दिलेले सर्व आमदार एका स्पेशल फ्लाईटने गोव्याला जाणार आहेत अशी माहिती बी सी पाटील यांनी दिली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
राजीनामा सत्रानंतर नाराज आमदारांशी संवाद साधून कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार टिकविण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात अशी आशा दोन्ही पक्षातील जेष्ठ नेत्यांनी बोलून दाखवली होती. मात्र आता आमदारांनी थेट गोवा गाठल्याने ते चर्चेद्वारे तोडगा काढण्यास तयार आहेत की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
दरम्यान, आमदार बी सी पाटील यांनी माहिती दिल्याप्रमाणे राजीनामा दिलेले आमदार गोव्याला गेले असल्यास कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारमधील प्रमुख नेत्यांपुढे या आमदारांशी कशाप्रकारे संवाद साधावा हे आव्हान उभे ठाकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तत्पूर्वी, जेडीएसचे जेष्ठनेते विश्वनाथ यांनी राजीनामा दिलेल्या आमदारांची संख्या १४ असल्याचं सांगितलं असलं तरी आतापर्यंत ११ नावांचाच खुलासा होऊ शकला आहे.
BC Patil, Karnataka Congress MLA on Congress-JDS MLAs who submitted their resignations to the Speaker: MLAs are flying to Goa on a special flight. pic.twitter.com/W65A2Aogtu
— ANI (@ANI) July 6, 2019