रस्त्यांवरील खड्डयांची आरटीओ कडे तक्रार

प्रादेशिक परिवहन कायद्यानुसार महापालिकेवर कारवाईची मागणी

पुणे  : पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे तसेच रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पुणेकरांना शारीरीक तसेच मानसिक व आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतुदीप्रमाणे रस्त्याची रचना, रस्त्याची दुरुस्ती यांची जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करावी अशी तक्रार सिटी आय संस्थेचे संजय शितोळे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे ( आरटीओ) केली आहे. तसेच या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शितोळे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, पुणे शहरात रस्त्याची झालेली दुरावस्था, त्यामुळे नागरिकांचे होणारे शारीरिक मानसिक आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पुणे-सातारा रस्ता- पद्मावती कॉर्नरजवळील , डी-मार्ट चौक येथील रस्त्यांची चाळण झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान होत असून या रस्त्याने प्रवास करताना , नागरिकांच्या मणक्‍याचे तसेच पाठीचे त्रास होत आहेत. या शिवाय, खड्डयांमुळे हा रस्ता धोकादायक बनला असून दुचाकी चालकांना कधी खड्डयामुळे रस्त्यावर पडेल अशी भिती घेऊनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्‍यता निर्माण जाली आहे.

अशा स्थितीत पथ विभागाकडे तक्रारी करूनही त्याकडे दूर्लक्ष होत आहे. त्यामुळे महापालिका यात लक्ष देत नसल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आम्हा नागरिकांना वाहन चालवण्यास अडचण येत आहे, तसेच अपघात होत आहेत. आमचा बहुमूल्य वेळ वाया जात आहे.
आमच्या वाहनांचे नुकसान होऊन आमच्यावर आर्थिक बोजा पडत आहे. परिणामी पुणेकर नागरिक मानसिक ,शारीरिक व आर्थिक संकटात सापडलो आहोत. आपल्याला कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपण योग्य ते आदेश पारित करून यावर कार्यवाही करावी अशी अपेक्षा शितोळे यांनी आपल्या तक्रारीत व्यक्त केली आहे.

ऑनलाईन तक्रारी परस्पर बंद
दरम्यान शितोळे यांनी या रस्त्यावर गटारीच्या झाकणाच्या समांतर पातळी विषयी गेल्या काही महिन्यात तब्बल 37 तक्रारी पथ विभागाकडे केल्या आहेत. मात्र, त्यातील एकाही तक्रारीवर कार्यवाही न करता या विभागाने परस्पर बंद केल्या आहेत. तर त्यांनी स्वत: पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून याची माहिती दिली असली तरी, पथ विभागानेही त्यांना काय कार्यवाही केली याची कोणतीही माहिती दिलेली नसल्याचे शितोळे यांनी महापालिका आयुक्तांनाही रस्त्यांबाबत केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here