राजगुरुनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील 188 शासनमान्य धान्य दुकानदारांना नवीन पॉस मशीनचे वाटप करण्यात आल्याने रेंजअभावी धान्य वाटपातील अडथळा दूर झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.
खेड तालुक्यातील 188 रेशनिंग दुकानादार आहेत. रेशनकार्डधारकांना पॉस मशिनद्वारे धान्याचे वाटप करताना रेंज नसल्यामुळे ग्रामीण दुर्गम भागात धान्य वाटपाला नेहमीच अडथळे येत आहेत. रेशनदुकानदारांचा आणि रेशन ग्राहकांचा यामध्ये वेळ जात होता. शासनाच्या वतीने मोबाईल नेटवर्क असलेले फोर जी चे कार्डसह डबल सिमसह नवीन पॉस मशिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
रेशन दुकाननिहाय डाटा अपडेट करुन देण्यात आला. त्यामुळे यापुढील काळात रेशनिंग दुकानदारांना रेंज नाही, मशिन चालत नाही, अशी कारणे देता येणार नाही. दुकानात आलेल्या रेशनकार्ड धारकांना वेळेत धान्य मिळण्यातील अडथळे दूर करण्यात प्रशासनाला यश आल्याचे महसूल नायब तहसीलदार राम बीजे यांनी सांगितले.
पंचायत समितीच्या राजा शिव छत्रपती सभागृहात या नवीन 188 पॉस मशिनचे नुकतेच वाटप करण्यात आले. तालुक्यातील 57 हजार रेशनकार्ड कुंटुबांना मे महिन्यापासून वेळेत धान्य मिळणार असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक गणेश रोकडे यांनी दिली. नवीन पॉस मशिनबाबतची हाताळणी मार्गदर्शन सर्व्हिस इंजिनिअर दीपक मेंधे, सुभाष जाधव यांनी केले तर महसूल पुरवठा विभागातील अविनाश कुलकर्णी, गणेश रोडे, स्वप्निल जैद व सचिन शिंदे यांनी रेशनिंग दुकानादारांना नवीन 188 पॉस मशीन वाटप केले.
बोगसगिरीला आळा
खेड तालुक्यातील शासनमान्य धान्य वाटप करताना शासनाने रेशनकार्डवरील सर्व नावे आधारकार्ड लिकिंग केल्याने बोगस आणि दुबार रेशनिंगवर धान्याचा होणारा काळा बाजार संपविण्यात शासनाला यश आले आहे.
शिवाय रेशन कार्ड वर ज्यांचे आधारकार्ड लिंक झाले आणि पाँस मशिनवर कुंटुबातील प्रमुखांने अंगठा देईल त्याच कुटुंबाला धान्य मिळणार असल्याने रेशनिंग दुकानातुन होणारा धान्याचा काळाबाजार बंद होणार आहे.
शहरातही रेशनकार्ड आणि मूळ गावीही एकत्रित कुंटुबातील असणारी नावाचा ऑनलाइन शोध घेऊन दुबार नावे काढण्यात आल्यामुळे धान्याची माणसी युनिट प्रमाणे होणारा धान्याचा दोनदा लाभ घेणा-या बोगसगिरीला आळा बसला आहे.