यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढविणार नाही – सुशीलकुमार शिंदे

प्रकाश आंबेडकर तत्वशून्य असल्याची टीका

सोलापूर  -सोलापूर मधून आपण 1974 पासून वेगवेगळ्या निवडणुका लढवत आलो आहोत. मात्र आता यापुढे कोणत्याही निवडणुकीत आपण उभा राहणार नाही. ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे सोलापूर लोकसभेचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी दुपारी प्रचार संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र यापूर्वीसुद्धा शिंदे यांनी आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत निवडणूक लढविली होती मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.

1974 पासून 2014 चा अपवाद वगळता आजपर्यंत सुशीलकुमार शिंदे सर्व निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. 1998-99 मध्ये दोन्ही वेळी सर्वसाधारण जागेवरुन निवडून दिले. दोन वेळा दक्षिण सोलापूर तालुक्‍यातून 2003 आणि 2004 या दोन्ही वेळी आमदारकीला निवडून दिले. हा लोकशाहीचा गौरव समजतो. एकाद्या दलित कार्यकर्त्याने सर्वसाधारण जागेवर निवडून येणे ही मोठी कठीण गोष्ट आहे. पण सोलापूरकरांनी जगाला दाखवले की, आमचा जिल्हा हा सर्वधर्म समभावाचा जिल्हा आहे. इथे जाती धर्माच्या नावावर काही चालत नाही. एकाद दुसरावेळी चालले पण बहुतेकवेळा चालले नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान ही निवडणूक धर्मावर तर दुसरीकडे जातीवर आधारित असलेल्यांच्या विरोधात लढवत आहोत. भाजपच्या वाटचालीत नसलेल्या उमेदवाराला धर्माच्या नावावर त्यांना उमेदवारी दिली. भाजपने आपला हेतू पुर्ण करण्यासाठी त्यांचा बळी देण्याचा प्रयत्न केला, असे शिंदे म्हणाले.

डॉ. बाबासाहेबांचे नातू वंचित आघाडीच्या माध्यमातून एमआयएम या कट्टर जातीयवादी पक्षाबरोबर गेलेत. प्रकाश आंबेडकर हे जातीयवादी पक्षासोबत गेले असून ते तत्वशून्य आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या सेक्‍युलॅरिझमचा खून केला आहे. जात पात न मानणारे सीपीएम त्यांच्यासोबत गेले. भाजपने उभे केलेले पिल्लू आहे. मतांच्या विभागणीसाठी वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर उभे आहेत, असा आरोपही शिंदे यांनी केला.

मोदींनी 5 वर्षात सोलापुरातील टेक्‍सटाइलमधून एक मीटर तरी कपडा खरेदी केलात का? सोलापूरचे जुने विमानतळ दुसरीकडे नेणार आणि त्याठिकाणी आयटी पार्क सुरू करणार. भाजपच्या आतापर्यंत निवडून आलेल्या 3-4 खासदारांनी एक तरी प्रकल्प सोलापुरात आणलाय का? आज भाजपकडे विकासाचा अजेंडा नाही. त्यामुळेच दुसऱ्या गोष्टी काढून टीका करत आहेत, अशा शब्दात पाच वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी सुशीलकुमार शिंदेंवर केलेल्या टीकेला शिंदे यांनी उत्तर दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)