पालिका सभेत जांभेळ व आंबेडकर यांच्यात खडाजंगी

साताऱ्यात टेंडर मंजुरीचे विषय साडेचारशे, एकही टेंडर निघाले नाही

अग्निशमन केंद्र, नको त्या उद्योगांचे केंद्र

मोना स्कूल व दगडी शाळा येथील अग्निशमन केंद्र नको त्या उद्योगांचे केंद्र बनल्याची तक्रार निशांत पाटील यांनी केली. ठेकेदाराने इमारतीचा अनाधिकाराने ताबा घेतला आहे, त्याची दादागिरी कशी चालवून घेता, असा जाब पाटील यांनी विचारताच अभियंता अनंत प्रभुणे यांनी सारवासारव केली. ठेक्‍याचे स्पष्टीकरण इंजिनिअर देतात, म्हणून अविनाश कदम यांनी नाराजी व्यक्‍त केली.

सातारा – अतिक्रमण व रस्त्याचे खड्डे हा विषय मोठा आहे. खड्डे भरायला पाहिजेत. वर्तमानपत्रात पालिकेवर रकानेच्या रकाने भरून येतात. टेंडर मंजुरीचे विषय तब्बल साडेचारशे घेण्यात आले. मात्र एकाचेही टेंडर निघाले नाही, अशी टीका भाजपचे सदस्य धनंजय जांभळे यांनी आज पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. याच्यावरून जांभळे व पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या सभेत अनेक विषयांवर जोरदार चर्चा झाली. काही विषयांत सत्ताधारी आघाडीला कोंडीत पकडण्यात आले. सातारा शहरातील धोकादायक खांब बदलणार कधी तसेच सातारा अ वर्ग नगर पालिका असताना येथील सतरांपैकी एकही शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेची मंजुरी मिळत नाही, मग आपण काय फक्‍त राष्ट्रीय सण साजरे करायचे का, असा जाब शेखर मोरे यांनी विचारला. प्रशासन अधिकारी एम. बी. भांगे याची उत्तरे देताना प्रचंड दमछाक झाली. भांगे यांना “ऑफिस कोठे आहे,’ अशी विचारणा निशांत पाटील यांनी केली.

शाळा क्रं. 23 येथील दहा गुंठे मैदानाचे आरक्षण तातडीने विकसित करण्याची मागणी मोरे यांनी केली. गेल्या तीन वर्षापासून 24 सफाई कर्मचाऱ्यांची भरती रखडली आहे. तुम्ही ही भरती करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी केला. जागा व कर्मचारी संख्या यांच्यात तफावत आहे. आता त्यांची फाईल संचालकांकडे आहे. शासनाची तत्वतः मान्यता आहे, असा खुलासा मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केला. राज्यात भाजपचे सरकार आहे. मंजुरीचा विषय धनंजय जांभळे यांना द्या, असा मार्मिक टोला निशांत पाटील यांनी लगावताच खंदारे व पाटील यांच्यात खडाजंगी झाली.

“चेष्टामस्करी सभागृहात करायची नाही,’ असे खंदारे यांनी पाटील यांना सुनावले. 36 कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाच्या पुण्यातील बैठकीला मुख्याधिकारीच उपस्थित नव्हते, असे अविनाश कदम यांनी सांगितले. गोडोली व कामाठीपुरा येथे पडलेल्या खड्डयाची तक्रार मनीषा काळोखे यांनी केली. पाणीपुरवठा विभागाला समर्थ मंदिर, मिरेकर चौक येथे वॉटरफ्लॅप बसवण्याच्या दोनशे तक्रारी केल्या, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही, अशी तक्रार जांभळे यांनी केली. शहराच्या पश्‍चिम भागात दोन वर्षात मुरूम पडला नाही, अशी तक्रार रवींद्र ढोणे यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)