दखल: बेताल विधाने आणि त्याचे परिणाम !

जयेश राणे

लोकसभा निवडणुकीचा पुढचा टप्पा जसजसा येतोय तसतसे राजकीय नेत्यांची जीभ घसरत चालली आहे. आपण काय बोलतोय, उत्साहाच्या भरात काय बोलून गेलोय याचेही भान नेतेमंडळींना राहिलेली नाही. दुसऱ्यांवर टीका करण्याच्या नादात चिखलफेक केली जातेय. नेत्यांची बेताल विधाने कमी होण्यापेक्षा त्यात वाढच होत आहे. चर्चेत राहण्यासाठी बेताल विधानांचा आधार घेतला जात असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाने काही नेत्यांवर बेताल विधाने केल्याप्रकरणी थोडीफार कारवाई केली आहे. तरीही बेताल विधाने करण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.

बेताल विधाने करण्याच्या आवेशात आपण काय करून बसतो आणि त्याचे होणारे परिणाम त्यावेळी माहीत नसतात. मात्र हा आवेश आणि बेताल विधाने यांकडे लक्षवेध होणे आवश्‍यकच आहे. बेताल विधाने केल्यावर कितीही गंभीर विषय असला तरी त्याचे गांभीर्य राहत नाही. त्या विषयाचे गांभीर्य टिकवून ठेवण्यासाठी बेताल विधानांचा उपयोग करणे बंदच झाले पाहिजे. गंभीर विषय म्हणजे मनोरंजन नाही. त्या विषयाला अनुसरून एखादे वाक्‍य बनवायचे आणि त्याचाच वारंवार उपयोग करत राहायचा. अशा गोष्टींमुळेच विषयांतर होते आणि मूळ मुद्दा मात्र बाजूलाच राहतो. समोरच्यास त्याच्या चुकीची जाणीव करून देण्याच्या योग्य पद्धतीचा उपयोग करणे आवश्‍यक असते. आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलो, तरी विचार नीटनेटके आणि सुस्पष्ट असावेत. यातूनच आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण होत असते.

तोल सुटल्यावर बेताल विधाने केली जातात. हा भाग राजकारणाशी संबंध असलेले, नसलेले या दोघांशीही निगडीत आहे. मात्र राजकारणात कसे होते की लोकप्रतिनिधीने बेताल विधान केल्यावर ते विधान उचलून धरले जाते. पुढे त्यावरून राजकीय रणकंदन चालू होते. ते विधान समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते. प्रिंट आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांसह सोशल मीडिया हे अत्यंत वेगवान माध्यम असल्याने ते क्षणार्धात सर्वत्र पोहोचत असल्याने कोण, कुठे आणि कोणत्या विषयावर काय बोलले आहे, हे चटकन कळते. बेताल विधाने ही कायमच बेताल असतात. त्यामुळे त्यांचे कोणी समर्थन करत नसते. देशातील जनता बेताल विधानांनी त्रस्त झाली आहे. तरीही बेताल विधाने थांबण्याचे नावच घेत नाहीत. या सूत्रांवरून नागरिक सडकून टीका करत असतानाही आपल्याला वाटते तेच नागरिकांवर लादणे कितपत योग्य? अनावश्‍यक विचार (बेताल विधाने) कोणावरही लादणे हा अन्याय नव्हे का? आज यांनी अमूक प्रकरणी बेताल विधान केले, तर पुढे अजून कोणीतरी तसे विधान केले, असे चक्र देशात चालू असते.

बेताल विधानप्रकरणी न्यायालयात जाण्याची वेळ येणे गंभीर आहे. आवश्‍यक त्या सूत्रांवर नेमकेपणाने बोलले पाहिजे. त्यातून तुम्हाला काय सांगायचे आहे, हे लक्षात येत असते. या चुकीतून बोध घेत बेताल विधाने आणि त्यांचा न्यायालयाशी संबंध जोडणे थांबवले जाईल का? या प्रकरणी न्यायालयाची फटकार लोकप्रतिनिधींसाठी बोधजनक आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा, असे म्हटले जाते. यातून अन्य लोकप्रतिनिधींनी बोध घेतला, तर न्यायालयाचा वेळ वाचणार आहे. सर्वोच्च न्यायालयासह देशातील अनेक न्यायालयांत खटले प्रलंबित आहेत. अनेक नागरिक खटल्यांच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना न्यायालयाला बेताल विधानांवर कान उघडणी करण्यासाठी वेळ द्यावा लागणे, हे अयोग्यच !

एखाद्याने व्यक्‍त केलेला विचार आणि घेतलेला निर्णय यांत अंतर आहे. विचार आणि निर्णय यांतील एकसामायिक सूत्र म्हणजे दोन्ही गोष्टींसाठी आधी विचार करावा लागतो. विचारांत मतभेद असले तरी मनभेद नसावेत. वरकरणी बरच काही सांगितले जात असले तरी काही ठिकाणी आत्यंतिक मनभेद असल्याचे लक्षात येते. जेव्हा टीका करताना वैचारिक मतभेदापेक्षा मनभेदातून टीका केली जाते. तेव्हा ती टीका अत्यंत सुमार पातळी गाठते. त्या त्या पक्षातील कार्यकर्तेही समाजात फिरताना आपल्या नेत्यानेच केलेले विधान उचलून धरतात आणि त्या आधारेच बोलत असतात.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. यातील प्रचारादरम्यान अनुभवण्यास मिळालेली एक गोष्ट अशी की, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्ष पुरस्कृत उमेदवार आपल्या प्रचारात “चौकीदार चोर है’ या घोषणा बेंबीच्या देठापासून ओरडून देत होते. त्याच वेळी समोर भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराचा प्रचार करणारे प्रचारकही समोर आले. त्यामुळे “चौकीदार चोर है’ ही घोषणाबाजी अधिकच वाढली. येथे तुफान संघर्ष निर्माण होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. एक तर सध्याच्या कडक उन्हामुळे वातावरण तप्त झालेलेच आहे. त्यात अशी घोषणाबाजी म्हणजे आगीत तेल ओतणेच होय.

पण सुदैवाने असे काही झाले नाही आणि महाआघाडीच्या प्रचारकांनी आपल्या घोषणा बदलल्या. येथे लक्षात घेण्याचे सूत्र असे की, निवडणुकीवेळी आणि त्या पार पडल्यावर आधीचा राग मनात ठेवून आत्मघातकी आक्रमणे करणे, खून करणे असे प्रकार केले जातात. म्हणजे कोणता मुद्दा कुठे जाऊ शकतो. याचे तारतम्य बाळगले जात नसल्याने प्रकरणे हातघाईवर येतात. त्यामुळे नेत्यांनी विधाने करताना आपण केलेल्या विधानांचा तळागाळातील कार्यकर्त्यांवरही काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार केला पाहिजे. नेत्याने बेताल विधान केले असले तरी त्या पक्षातील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते त्या विधानाशी सहमत असतातच असे नाही. मग ते विधान कोणतेही असू शकते. कारण कार्यकर्ता हा समाजात फिरत असतो. त्यामुळे समाजात काय चालू आहे? याची त्याला बित्तम बातमी असते. त्यामुळे विधाने करताना सारासार विचार करूनच केली पाहिजे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.