जेजुरीत नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये जुंपली

प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे रस्त्याचे काम रखडले

जेजुरी – तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपालिकेच्या हद्दीतील पंढरपूर पालखीमार्गाला जोडणारा कडेपठार कमान ते ज्ञानोबानगर रस्त्याचे काम गेल्या सात महिन्यांपासून रखडले असून या रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. काम कधी होणार याचे उत्तर मात्र नागरिकांना अजून ही मिळालेले नाही. केवळ प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळेच काम रखडल्याची चर्चा मात्र शहरात आहे.

कडेपठार कमान ते ज्ञानोबानगर पर्यंतचे काम दोन टप्प्यात होणार आहे. यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पालिकेने मोठा गाजावाजा करीत या कामाचा शुभारंभ सात महिन्यांपूर्वी केला होता. मात्र, अजून ही या कामाला सुरूवात झालेली नाही. या रस्त्यावरून देव दर्शनासाठी दररोज दीड ते दोन हजार भाविक येत आहेत. मात्र, रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने प्रवाशी, भाविकांचे मोठे हाल होत आहेत. याचबरोबर जेजुरी नगरपालिका येथे देवदर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या वाहनांकडून प्रवेशकर घेते. या रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की भाविक प्रवेश का द्यावा? असा सवाल करीत आहेत.

नागरिक व भाविकांचे होणारे हाल आणि वारंवार येणाऱ्या तक्रारीवरून पालिकेतील नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी या रस्त्याचे काम ठेकेदार एस. आर. काळे यांना सुरू करावयास भाग पाडले होते. मात्र ठेकेदाराने आपणास पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या कामास स्थानिकांकडून कायदेशीर हरकत घेतल्याचे सांगून काम बंद ठेवण्यास तोंडी आदेश दिल्याचे सांगितले. मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशावरून काम बंद ठेवण्याचे काहीच कारण नसून ते काम त्वरित सुरू करावे, अथवा या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची जबाबदारी ठेकेदार म्हणून तुम्ही घ्यावी, असे या ठेकेदारास नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी सुनावल्याने ठेकेदाराने दोन दिवसांपूर्वी काम सुरू केले होते. मात्र, पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी काम करू नये, अन्यथा बिल काढले जाणार नाही, अशी धमकी दिली आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आदेश दिल्यानंतरच काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कामाला हरकत असल्याने काम करू नका असा पवित्रा मुख्याधिकाऱ्यांनी घेतला आहे तर न्यायालयाचा आदेश दाखवा आणि काम बंद ठेवा, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. या वादात मात्र नागरिक आणि भाविकांचे मोठे हाल होत आहेत. या संदर्भात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

मुख्याधिकारी जाणीवपूर्वक या कामाला अडचणी निर्माण करीत आहेत. या कामाला हरकत आहे तर तसे लेखी द्यावे, अथवा न्यायालयाचे आदेश दाखवावेत अशी मागणी वारंवार करून ही त्यांनी आमच्यासमोर काहीच मांडलेले नाही. हा रस्ता पूर्वीचा आहे. याची अनेकदा दुरूस्ती झालेली आहे. तेव्हा कोणाची हरकत नव्हती. मग आताच कशी हरकत आहे, याचे उत्तर ही आम्हाला अजूनपर्यंत मिळालेले नाही. उलट ठेकेदाराला धमकाऊन काम बंद ठेवले जात आहे. एक दोन महिन्यांत हे काम झाले नाही तर सुमारे दीड कोटींचा निधी शासन जमा होऊ शकतो. चालू कामात कोर्टाचा कोणताही निर्णय नसताना प्रशासनाने काम बंद केले तर त्याच जागेवर नगरसेवक आणि नागरिकांना घेऊन आपण ठिय्या आंदोलन करणार आहोत.
– वीणा सोनवणे, नगराध्यक्षा, जेजुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)